पर्यटनमंत्र्यांच्या अमेरिका दौर्‍यात अन्य खात्यांचे कर्मचारी का?

0
199

>> अबकारी, ईएसआय कर्मचार्‍यांमुळे कॉंग्रेसचा प्रश्‍न

पर्यटनाच्या प्रचारासाठी पर्यटन मंत्री मनोहर आजगांवकर यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेला रवाना झालेल्या पथकात पर्यटन खात्याच्या अधिकार्‍यांबरोबरच अबकारी आणि ईएसआय खात्यातील कर्मचार्‍यांचा समावेश असल्याने हे पथक खरोखरच पर्यटन प्रचारासाठी गेले की मौजमजा करायला गेले आहेत? असा प्रश्‍न कॉंग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.

मागील कित्येक वर्षापासून अमेरिकेतून जास्त पर्यटक गोव्यात येत नाहीत. राज्यात येणार्‍या विदेशी पर्यटकांच्या संख्येत अमेरिकेतील पर्यटकांची संख्या केवळ दोन ते तीन टक्के एवढीच आहे, असे आकडेवारीवरून दिसून येत आहे. अमेरिकेतून गोव्यात २०१४ मध्ये ९९७९ पर्यटक, २०१५ मध्ये १२,२२७ पर्यटक आणि २०१६ मध्ये ६८३३ पर्यटक आले आहे, असे पणजीकर यांनी सांगितले.

अमेरिकेत गेलेल्या पथकामध्ये अबकारी आणि ईएसआय या खात्यातील कर्मचार्‍यांचा कशासाठी समावेश करण्यात आला आहे. या पथकामध्ये एकाच आडनावाच्या तीन व्यक्तींचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचा या पथकात समावेश असल्याचा संशय पणजीकर यांनी व्यक्त केला. अमेरिका दौर्‍यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांना डावलण्यात आले आहे, असा दावा पणजीकर यांनी केला.