पर्यटकांना ‘उत्तेजन’ देणारे पर्यटन धोरण!

0
96

– रमेश सावईकर
पर्यटन उद्योग हा राज्याचा एक प्रमुख महसूल स्रोत आहे. त्यामुळे पर्यटनाला अधिकाधिक वाव देण्याचे सरकारचे धोरण आहे. गोव्यात विदेशातून व देशातून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत बेसुमार वाढ होत आहे. पर्यटकांना चांगल्या सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटक उद्योग राज्याला भरपूर महसूल उत्पन्न देऊ शकतो, असा विचार करून पर्यटनविषयक धोरण ठरविले जाते. पर्यटनामुळे सकारात्मक बाबींचा विचार केला जात असताना त्या उद्योगामुळे राज्यात मारक अशा घडणार्‍या घटना, संस्कृतीवर होणारा घाला, गुन्हेगारीत होणारी वाढ, अमली पदार्थ व्यवसायात गुंतल्याने युवा पिढी बिघडण्याचा दुष्परिणाम आदी बाबींचा सरकार विचारच करीत नाही. त्यामुळे भविष्यात होणारे दुष्परिणाम गोमंतकियांना भोगावे लागतील हे नक्कीच! राज्यातील किनारपट्टी भागात संगीत महोत्सवांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यापूर्वी आयोजनामागचा उद्देश व त्याचे फलीत याचा विचार केला जात नाही. या महोत्सवात नेमके काय चालते याचा अहवाल जिल्हाधिकारी व पोलीस अधिकार्‍यांनी सरकारला सादर करूनही त्याकडे जाणून बुजून डोळेझाक केली जाते, अशी माहिती उघड झाली आहे. हे अहवाल माहिती हक्क कायद्याखाली उपलब्ध झाल्याने राज्य सरकारचे नकली रूप उघड झाले आहे. अशा प्रकारचे संगीत महोत्सव घडवून आणण्यास जाणून बुजून सरकारची परवानगी मिळते, त्यामागचे खरे सूत्रधार कोण आहेत हे आता शोधून काढले पाहिजे. अर्थात जनतेला अंधारात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिकार्‍यांकडून दिले जाणारे अहवाल गुप्त ठेवण्यामागे राजकीय पुढार्‍यांचा हात असल्याशिवाय हे घडणार नाही. किनारपट्टी भागात संगीत महोत्सवात काय घडते हे सर्वश्रूत आहे. ज्या मारक गोष्टी घडतात त्याकरिता जनता सरकारी अधिकारी व पोलिसांना जबाबदार धरतात. पण त्या बिचार्‍यांवर राजकीय दडपण असल्याने ते ब्र काढू शकत नाही.
उत्तर गोव्यात कांदोळी व अंजुणा या ठिकाणी दरवर्षी संगीत महोत्सव साजरे होतात. कांदोळी येथील संगीत महोत्सवाचे ठिकाण दहशतवादी हल्ल्यासाठी पूरक आहे असा स्पष्ट गंभीर इशारा राज्य पोलीस प्रमुखांनी गेल्या वर्षी सरकारला दिलेल्या अहवालात देऊनही त्याची नोंद घेतली जात नाही, ही खेदाची बाब आहे. राज्याच्या सुरक्षिततेचा विचार करता ही चिंतेची बाब आहे.
आपत्ती काळात कांदोळी येथील संगीत महोत्सवाचे ठिकाण अरुंद असल्याने अग्निशमन यंत्रणा, मदतकार्य करणारी यंत्रणा तेथे पोहोचू शकणार नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. याची नोंद घेऊन सरकारने पुढील कृती करण्याचे का टाळले, हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. लोकप्रतिनिधी अशा गोष्टींबाबत मूग गिळून गप्प का राहतात? किनारपट्टी भागांतील पर्यटकांसाठी आयोजित संगीत महोत्सवात अमली पदार्थ सेवन करून धिंगाणा घातला जातो. २००९ साली अमली पदार्थ अतिसेवनामुळे एका युवतीचा अशा महोत्सव ठिकाणी मृत्यू झाला होता. यावरून केवळ संगीताचे आस्वाद घेऊन मजा लुटण्यासाठी हे महोत्सव नसतात तर अमली पदार्थ सेवन करून मद्यधुंद वातावरणात नंगा नाच व मौज लुटण्यासाठी या महोत्सवांचे आयोजन केले जाते. सरकार हे का खपवून घेते?
महोत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा पोलीस अधिकार्‍यांचा आदेशही आयोजकांनी धुडकावून लावला आहे. हे सारे प्रकार सरकार खपवून घेणार असेल तर त्याविरुद्ध न्याय मागण्याची पाळी जनतेवर येऊन ठेपली आहे. पर्यटन उद्योग चालावा म्हणून वाट्टेल त्या थरापर्यंत जाण्याची सरकारची ही वृत्ती व धोरण घृणास्पद आहे. त्याविरुद्ध आता गोमंतकीय जनतेने आवाज उठवून रस्त्यावर येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही!
किनारपट्टी भागातील पर्यटन ठिकाणांवर अमली पदार्थ विक्री व्यवसाय चालतो. कळंगूट, कांदोळी येथे सिगारेटच्या पाकिटांतून गांजाची खुलेआम विक्री चालते. हे प्रकार सरकार बंद करू शकत नाही काय? तरुण पिढीला या प्रकाराचे आकर्षण वाटते. अंमली पदार्थ व्यवसायात गुंतून त्यांची विक्री व सेवन करण्यात तरुण पिढी वाया जाते आहे. विदेशी व देशी पर्यटकांची संख्या वाढावी, ते पर्यटनस्थळी आकर्षित व्हावे म्हणून या प्रकारांकडे दुर्लक्ष केले गेले तर त्याची किंमत गोमंतकियांना मोजावी लागेल.
परदेशातील विशेष करून रशियन, नायजेरियन पर्यटक येऊन गोव्यात स्थायिक झाले आहेत. अशा विदेशी नागरिकांचे वास्तव्य राज्यांतील सागर किनारी भागांत वाढले आहे. त्यांची दादागिरी वाढत असल्याचे गेल्या वर्षभरात घडलेल्या काही घटनांवरून उघड झाले आहे. सरकारने मात्र त्याची आजतागायत अजिबात दखल घेतलेली नाही. विदेशींनी राज्यांतील जमिनी खरेदी करून स्थिरस्थावर होण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे राज्यांतील जमिनी परप्रांतियांना विकण्यावर कायद्याद्वारे नियंत्रण अथवा बंदी घालण्याची पाळी सरकारवर आली आहे.
अंजुणा व वागातोर येथे नाईट मार्केट चालते. विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात विदेशी मालाची विक्री या नाईट बाजारात करतात. अमली पदार्थांची विक्री करण्याची अप्रत्यक्ष संधीच त्यामुळे पर्यटकांना लाभते. सर्वांत चांगला उद्योग चालतो तो किनारी कुटिरधारकांचा! पर्यटक पर्यटनाच्या मोसमात किनारपट्टी भागातील कुटिरात डेरेदाखल होऊन तंबू ठोकतात. वर्षातून किमान सहा महिने वास्तव्य करून नैसर्गिक सौंदर्य लुटण्याच्या नावाखाली सर्व ते गैरव्यवहार, गैरव्यवसाय करण्याचे उद्दिष्ट ते साध्य करतात. संगीत रजनी पार्ट्या, संगीत महोत्सव, नाईट मार्केट यांवर राज्य सरकारने पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. पण ते घडत नाही. कारण जे घडते त्यामागच्या सूत्रधारांना राजाश्रय असतो. राज्य चालविणार्‍यांनी आपली संस्कृती, धर्म, आचार-विचार आदी सारेंच खुंटीला टांगून ठेवण्यात स्वतःला धन्य समजलेले असेल तर त्यांची मनोधारणा नि मनोवृत्ती कोण व कशी बदलणार?
उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागात पर्यटनविषयक ज्या गैरबाबी बेसुमार चालतात, तोच प्रकार दक्षिण गोव्यातील किनारपट्टी भागांत चालतो. सरकारला पर्यटनक्षेत्राला खरोखरच वाव द्यायचा असेल तर राज्यांतील ऐतिहासिक नैसर्गिक सौंदर्यस्थळे, वास्तू, पुरातन किल्ले, धबधबे आदींचे जतन, सौंदर्यीकरण करण्यासाठी खास योजना का हाती घेण्यात येत नाही? अशा स्थळांकडे देशी-विदेशी पर्यटक आकर्षित व्हावे म्हणून त्यांच्यासाठी पर्यटन वाहतूक सेवा, पर्यटनस्थळी कुटिर निवास सुविधा उपलब्धीवर लक्ष कां केंद्रित करण्यात येत नाही? ऐतिहासिक निसर्ग सुंदर ठिकाणांची पर्यटनस्थळे म्हणून विकास झाला तर गोव्याची चांगली प्रतिमा देशभर होईल. गोवा हे ‘खा, प्या, मजा करा’ करण्यासाठीचे पूरक राज्य स्थळ आहे. अशी निर्माण झालेली मलीन प्रतिमा धुवून काढून स्वच्छ-सुंदर प्रतिमा जगभरात निर्माण करायची असेल तर संस्कृतीवर्धक पर्यटन धोरण अमलात आणण्याचा सरकारने निर्धार करायला हवा!