मठाच्या 550 वर्षपूर्ती सोहळ्यास प्रारंभ
श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या 550 व्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांचे काम या ठिकाणी हातात घेण्यात आले आहे. काल शुक्रवारी 7 रोजी या ठिकाणच्या नूतन जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात श्रीराम मूर्ती प्रतिष्ठा आणि शिखर कलश प्रतिष्ठा श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजा आणि अन्य धार्मिक विधींनुसार करण्यात आली.
यावेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, सौ. पल्लवी धेंपो, उपाध्यक्ष आर. आर. कामथ, शिवानंद साळगावकर, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, योगेश कामत व मोठ्या संख्येने मठाचेे अन्य अनुयायी उपस्थित होते. दरम्यान येथे उभारलेल्या आराध्य दैवत श्री वीर विठ्ठल मंदिराचे सोमवार दि. 10 रोजी दुपारी 11 वा. उद्घाटन त्याचप्रमाणे नूतन वैदिक संकुल, इंदिराकांत भवन, गोशाळेचे उद्घाटन स्वामीजींच्या हस्ते होणार आहे. या ठिकाणी 77 फूट उंचीच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती उभारणीचे, मल्टिपर्पज सभागृह आवास संकुलाचे काम सुरू आहे. दि. 26 नोव्हेंबर रोजी पर्तगाळी मठात श्रीराम दिग्विजय रथ यात्रेचे आगमन होणार आहे आणि 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतीक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत.
मठाच्या प्राकारात उभारण्यात आलेल्या श्री प्रमू रामचंद्रांच्या 77 फूट उंच आणि भव्य अशा मूर्तीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्या दृष्टीने जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे.

