पाच दिवसांत परराज्यातील ६३३ गोमंतकीय गोव्यात

0
175

राज्यात गेल्या १ ते ५ मे या पाच दिवसात परराज्यात असलेल्या ६३३ जणांना प्रवेश देण्यात आला आहे. परराज्यातून येणार्‍या गोमंतकीयांची तपासणी करून अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहेत. तर, गोमंतकीय नसलेल्या व्यक्तीला १४ दिवसांसाठी सरकारी क्वारंटाईऩ केंद्रात ठेवले जात आहे.

कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरुवातीच्या काळात आरोग्यखात्याकडून अनेकांना होम क्वारंटाईऩ केले जात होते. काही होम क्वांरटाईऩ केलेले नागरिक मुक्तपणे फिरत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यानंतर आरोग्यखात्याने होम क्वारंटाईऩ केलेल्या व्यक्तीच्या घरावर स्टिकर्स लावण्यास सुरुवात केली होती. गोव्याचा हरित विभागात समावेश झालेला आहे. परराज्यात अडकून पडलेल्या अनेक गोमंतकीय गोव्यात परत येऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी क्वारंटाईन करण्यात येणार्‍या व्यक्तीची संख्या वाढू लागली आहे. १ ते ५ मे या पाच दिवसांच्या काळात ६३३ जणांना राज्यात प्रवेश देण्यात आला आहे. परराज्यातून येणार्‍या व्यक्तीची सरकारी क्वारंटाईऩ केंद्रात रवानगी केली जाते. सदर व्यक्तीची कोविड चाचणी केली जाते. या चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर सदर व्यक्तीच्या हातावर होम क्वारंटाईन शिक्का मारून घरी पाठविले जात आहे. गोमंतकीयांच्या घरवापसीमुळे क्वारंटाईऩ करण्यात येणार्‍याच्या संख्येत आगामी काळात होम क्वारंटाईन करण्यात येणार्‍यांच्या संख्येत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. गोवा हे हरित राज्य घोषित करण्यात आल्याने गोमंतकीय नागरिकांव्यतिरिक्त राज्यात मालमत्ता विकत घेतलेले इतर राज्यातील नागरिक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. होम क्वारंटाईन केलेला व्यक्ती बाहेर फिरताना आढळून आल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन केले आहे. सदर व्यक्तीची पेड क्वारंटाईनमध्ये रवानगी करण्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला आहे.

गोमेकॉत ८ संशयित दाखल
बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना आयझोलेशन विभागात कोरोना संशयित ८ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहेत. तसेच, सरकारी क्वारंटाईनखाली आणखी ८२ जणांना आणण्यात आले आहे. जीएमसीच्या कोविड प्रयोग शाळेत तपासण्यात आलेले २०० नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास विभागात ४ संशयितांवर उपचार सुरू आहेत. सरकारी १० क्वारंटाईऩ केंद्रात १५२ जणांना ठेवण्यात आले आहेत.

काल ८२ जण गोव्यात
गोव्यात परराज्यातून परतलेल्या गोमंतकीयांत काल दि. ५ रोजी ८२ जणांचा समावेश होता. दि. १ मे रोजी ३८, दि. २ मे रोजी ११६, दि. ३ मे रोजी २२१, दि. ४ मे रोजी १७६ तर काल दि. ५ मे रोजी ८२ जण गोव्यात परतले. काल दि. ५ मे पर्यंत राज्यात परतलेल्यांची संख्या ६३३ झाली आहे.