निवडणुकीत विजय मिळो किंवा न मिळो आपण कोणत्याही बाबतीतील कामगिरीची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी काल सांगितले. एक्झिट पोलच्या निष्कर्षांच्या पार्श्वभूमीवर बेदी यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तथापि बेदी यांचे हे वक्तव्य म्हणजे भाजपच्या संभाव्य पराभवाच्या जबाबदारीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लांब ठेवण्याचा खटाटोप असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात आहे. मतमोजणी उद्या होणार आहे. काल भाजपच्या नेत्या निर्मला सीताराम यांनी श्रीमती बेदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर बेदी यांनी वरील वक्तव्य केले. अंतिम निकालासाठी उद्यापर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल असेही त्या म्हणाल्या.

