लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या गोमंतकीय नागरिकांच्या नोंदणीसाठी राज्य सरकारने खास संकेतस्थळ (पोर्टल) कार्यान्वित केले आहे.
गोव्यात परतण्यास इच्छुक असलेल्या गोमंतकीय नागरिकांनी या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे अनेक गोमंतकीय परराज्यात अडकलेले आहेत. केंद्र सरकारने मजूर, विद्यार्थी, पर्यटक यांना प्रवास करण्यास मान्यता देण्याचा निर्णय घेतल्यानंतर गोवा सरकारने परराज्यात अडकलेल्या गोमंतकीय नागरिकांना मदत करण्यासाठी खास संकेतस्थळ कार्यान्वित केले आहे. या संकेतस्थळावर नोंदणीसाठी गोमंतकीय असल्याचा दस्ताऐवज सादर करावा लागणार आहे.
या संकेतस्थळावर नोंदणी करणार्यांना गोव्यात येण्यासाठी ऑन लाईऩ पद्धतीने पासचे वितरण केले जाणार आहे. गोव्यात परतल्यानंतर कोविड चाचणीसाठी एक किंवा दोन दिवस क्वारंटाईऩ केले जाणार आहेत. कोविड चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठविले जाईल किंवा सरकारी क्वारंटाईन केंद्रात पाठविले जाईल याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली.
२९०० गोमंतकीयांची नोंदणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विदेशातून गोव्यात येण्यासाठी आत्तापर्यत २९०० गोमंतकीयांनी नोंदणी केली आहे. येथील अनिवासी भारतीय आयुक्तालयाने विदेशातून गोव्यात येऊ इच्छिणार्या गोमंतकीयांच्या नोंदणीसाठी खास संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर प्राप्त होणारी माहिती केंद्रीय मंत्रालयाकडे सादर करून गोमंतकीयांनी आणण्याची मागणी केली जाणार आहे. दरम्यान, गोव्यात अडकून पडलेले परराज्यातील नागरिक आपल्या राज्यात परत जाण्यासाठी प्रशासनाकडून मान्यता घेण्यासाठी सरकारच्या संकेतस्थळावर ऑन लाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन प्रवास करण्यासाठी आवश्यक मान्यता घेऊ शकतात. जिल्हा प्रशासनाला प्रवास परवाने देण्याच्या कामाला गती देण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल दिली.