– दत्ता भि. नाईक
२६ डिसेंबर १९२० रोजी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अधिवेशन नागपूर येथे भरले होते. आतापर्यंतच्या सर्व अधिवेशनांच्या तुलनेने हे अधिवेशन सर्वाधिक संख्येचे होते. पंधरा हजाराच्या जवळपास एकूण उपस्थिती होती. टिळक युगाचा अस्त होऊन गांधी युगाचा उदय झाला होता. अधिवेशन शिस्तबद्धतेने चालू होते. स्वयंसेवक खाकी गणवेश व साफे घालून वावरत होते. पाच महिन्यांपूर्वी लोकमान्य टिळकांचे निधन झाल्याच्या दुःखाची छायाही या अधिवेशनावर होतीच; शिवाय गांधीजींनी खिलाफत चळवळीची तळी उचलून धरून तुर्कस्थानचा प्रश्न भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी जोडल्याबद्दल अस्वस्थताही होती.
सी. विजयराघवाचारियार यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन सुरू झाले. बॅ. चित्तरंजन दास यांनी खिलाफत चळवळीचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी सांगड घालणारा ठराव मांडला व तो पारित झाला. याच अधिवेशनात स्वागत समितीच्या वतीने नागपुरातील स्थानिक कार्यकर्त्यांनी एका ठरावाचे प्रारूप तयार केले होते. या ठरावाच्या प्रस्तावनेत ‘हिंदुस्थानचे प्रजासत्ताक निर्माण करून भांडवलशाही राष्ट्रांच्या जाचातून जगातील देशांची मुक्तता करणे हे कॉंग्रेसचे ध्येय आहे’ अशा आशयाचे वाक्य होते. विषय नियामक समितीने ‘जगातील देशांच्या मुक्तते’च्या कल्पनेचा उपहास करून हा ठराव अधिवेशनासमोर येऊ दिला नाही. पुढे १९२९ साली जनमताच्या रेट्यामुळे कॉंग्रेसला लाहोर येथील अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज्या’चा प्रस्ताव पारित करावाच लागला. नागपूर येथील अधिवेशनात हिंदुस्थानचे प्रजासत्ताक निर्माण करण्याची कल्पना मांडणार्या कार्यकर्त्यांचे नेते होते डॉ. केशव बळीराम हेडगेवार.
देशभक्ताचा पिंड
वर्षप्रतिपदा, शालिवाहन, शक १८११, युगाब्द ४९९१ ही बाल केशवची जन्मतिथी म्हणजे १ एप्रिल १८८९. हेडगेवार हे घराणे मुळचे तेलंगणातील कुंदकुर्ती येथले. बळीरामबुवा हेडगेवार हे अग्निहोत्र स्वीकारलेले वैदिकीतील पट्टीचे विद्वान म्हणून नागपुरात ओळखले जायचे. बळीरामबुवा व रेवतीबाई यांचे केशव हे सहावे व शेवटचे अपत्य. केशव अकरा वर्षांचा असतानाच सर्वत्र देशभर पसरलेल्या प्लेगच्या साथीत एकाच दिवशी बळीराम-रेवती हे जोडपे इहलोक सोडून परलोकी गेले. त्यामुळे विद्वान असूनही त्यावेळच्या पैलवानांप्रमाणे भांग पिण्याचे व्यसन लागल्यामुळे थोरल्या भावाकडून व्हावे तसे संगोपन होणे त्याच्या वाट्याला आले नाही.
सन १८९७, बावीस जून होती सूर्यास्त न होणार्या ब्रिटिश साम्राज्याची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिचा राज्यारोहणाचा साठावा वर्धापनदिन सर्वत्र साजरा केला जात होता. त्याप्रमाणे नागपूरमध्येही ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. नागपूरच्या नीलसिटी हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे पुडे वाटण्यात आले. वय वर्षे आठ असलेल्या केशवने तो खाऊचा पुडा घरी आल्यावर केराच्या टोपलीत फेकून दिला. ‘‘तुला खाऊचा पुडा मिळाला नाही का?’’ असे ज्येष्ठ बंधूनी विचारताच त्याने ‘‘आपले राज्य जिंकणार्या राजांच्या समारंभाचा आनंद तो कसला?’’ असे ताडकन उत्तर केशवने देऊन आपल्या देशभक्त वृत्तीची चुणूक दाखवली.
सीताबर्डीच्या किल्ल्यावरील इंग्रजांचा युनियन जॅक हा साम्राज्यध्वज काढून फेकून देण्यासाठी केशव व त्याचे मित्र त्यांच्या वझे नावाच्या शिक्षकाच्या घरातून भुयार खणण्याचा प्रयत्न करत होते, यावरून त्याचा पिंड जन्मजात देशभक्ताचा होता हे लक्षात येते.
वंदे मातरम्
सन १९०५ मध्ये वंगभंग विरोधी आंदोलनामुळे देशात देशभक्तीचे वारे सळसळू लागले होते. एका झटक्यात ‘वंदे मातरम्’ हे गीत राष्ट्रीय चळवळीचे प्रतीक बनले होते, तर नुसती ‘वंदे मातरम्’ ही घोषणा स्वातंत्र्याचा मंत्र बनली होती. त्यामुळे ‘वंदे मातरम्’चा नुसता उच्चार केला तरी त्या व्यक्तीवर राजद्रोहाचा खटला भरला जात असे.
‘‘देशभक्तीच्या गोष्टी आपल्यासारख्या गरिबांसाठी नाहीत. या नसत्या भानगडीत तू का पडतोस? खावे, प्यावे, घरची कामे करावीत, दंड-बैठका काढाव्यात- पण या नसत्या उठाठेवी कशाला? आपण बरे की आपले बरे!’’ हा ज्येष्ठ बंधू महादेवशास्त्र्यांचा उपदेश न मानवल्यामुळे देशभक्तीच्या भावनेने भारलेल्या तरुण केशवचे घरी जाणे-येणेसुद्धा हळूहळू कमी होऊ लागले होते. याच काळात सरकारकडून ‘रिस्ले सर्क्युलर’ नावाचे एक परिपत्रक शाळा-शाळांना पाठवण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवून त्यांच्या हालचालींबद्दल माहिती पाठवण्याचा मुख्याध्यापकांना आदेश होता. १९०८ मध्ये या सर्क्युलरला विरोध करण्याचे केशव बळीराम हेडगेवार तसेच त्याच्या मित्रांनी ठरवले. शाळा तपासनीस शाळेत आले असता नीलसिटी हायस्कूलच्या प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांचे ‘वंदे मातरम्’ या घोषणेने स्वागत केले. त्यामुळे पर्यवेक्षक संतापले. विद्यार्थ्यांना माफी मागेपर्यंत वर्गात न बसण्याची शिक्षा देण्यात आली. यामागे कोणकोण आहेत त्यांची नावे सांगा असे सांगितल्यावरही कोणत्याही विद्यार्थ्याने त्यांच्या नेत्याचे नाव सांगितले नाही. हे आंदोलन दीड-दोन महिने चालले. शेवटी शाळा बुडता कामा नये म्हणून विद्यार्थ्यांनी मान खाली करावी व वर्गात जाऊन बसावे हा पर्याय देण्यात आला व तो सर्व विद्यार्थ्यांनी मान्य केला. पण दोनच विद्यार्थ्यांनी याला विरोध केला. त्यात एक विद्यार्थी होता केशव बळीराम हेडगेवार.
माघार न घेतल्यामुळे केशवचे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर यवतमाळ येथील राष्ट्रीय विचारांच्या विद्यागृहात केशवला प्रवेश देण्यात आला. त्यामुळे त्याचे शिक्षण पूर्ण होऊ शकले.
क्रांतिकारकांच्या सान्निध्यात
डिसेेंबर १९०९ मध्ये केशव बळीराम हेडगेवार शालान्त परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यावेळी कुठेही नोकरी वा व्यवसाय करण्याकरिता हे शिक्षण पुरेसे होते. पण वैद्यकीय शिक्षणासाठी केशवरावांनी कलकत्त्यास जावे असे डॉ. मुंजे, लोकनायक अणे यांसारख्या नेत्यांनी सुचवले. कलकत्त्यास जाण्यामागे तेथे चालू असलेल्या क्रांतिकारी संघटनांमध्ये काम करणे हाही केशवरावांचा उद्देश होताच. कलकत्त्यात राहण्याची गैरसोय सोसूनही केशवरावांनी वैद्यकीय शिक्षणासोबत बॉम्ब बनवणे वगैरे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
वंगभंग विरोधी आंदोलनामुळे तप्त झालेल्या कलकत्ता शहरात १९०८ साली म्हणजे केशवराव शहरात येण्याच्या दोन वर्षांपूर्वी खुदिराम बोस या क्रांतिकारकाने किंग्सफर्डच्या बग्गीवर बॉम्ब टाकल्यामुळे एका क्रांतियुगाची सुरुवात झाली होती. पुलीनबिहारी दास यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या अनुशीलन समितीचे केशवराव सदस्य बनून जागृती करणारी पत्रके वाटणे वगैरे कामे करायचे. १९१३ मध्ये पुलीनबाबूंवर विविध आरोप ठेवून इंग्रज सरकारने त्यांना अंदमानला काळ्या पाण्यावर पाठवले. अनुशीलन समितीत प्रवेश मिळवणे सोपे नव्हते. माणसाची वृत्ती, त्याचे चारित्र्य, शारीरिक बळ, छळ सोसण्याची क्षमता, आज्ञाधारकता, संयम इत्यादी गोष्टी प्रयोग करून तापासल्या जायच्या. जळणार्या ज्योतीवर हात ठेवून प्रतिज्ञा घ्यावी लागत असे व कालिमातेच्या मंदिरात व स्मशानात विधिपूर्वक संस्कार करून घ्यावे लागत असत. काहींना सांकेतिक नावे स्वीकारावी लागत. त्या काळात केशवरावांचे सांकेतिक नाव होते- ‘कोकेन.’
होय, हे हिंदुराष्ट्र आहे!
कलकत्त्यातून डॉक्टरीची सनद मिळवल्यानंतर केशवरावांनी क्रांतिकारकांच्या समवेत काही वर्षे काम केले. नागपूरमध्ये आल्यानंतर गांधीजींच्या चळवळीत भाग घेत असतानाच जहाल मतवादी व क्रांतीवर विश्वास असलेल्यांशीही त्यांचा संबंध येत असे.
डॉ. हेडगेवार यांचे आता विचारमंथन सुरू झाले. हे राष्ट्र आहे तरी कुणाचे? केवळ इंग्रज निघून गेले की या देशाचे सर्व प्रश्न सुटतील काय? यांसारखे अनेक प्रश्न त्यांना भेडसावू लागले होते. इंग्रजांनी सुरू केलेल्या विद्यापीठांतून भारतीयांना विभाजित करण्यासाठीचे शिक्षण दिले जायचे. आर्य-द्रविड भांडणाचे विष त्यांनी शिक्षणातून पेरले होते. भारतात राहणार्या लोकसमूहाचा हा प्रदेश, या प्रदेशाला राष्ट्रीयत्व म्हणून काही नाही यांसारखे विचार इंग्रजप्रेरित शिक्षणातून कॉंग्रेसच्या व्यासपीठावरूनच मांडले जाऊ लागले होते. महात्मा गांधींनीही हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या नावाखाली परखड धोरण स्वीकारले होते. अशा परिस्थितीत या राष्ट्राचा खरा आत्मा हिंदुत्व आहे याचा साक्षात्कार अंदमानच्या कारागृहात शिक्षा भोगणार्या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना झाला होता व त्याच काळात या सत्याचा साक्षात्कार डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना झाला होता. म्हणूनच त्यांनी एका ज्येष्ठांच्या बैठकीत बहुतेकांचा विरोध सहन करून ठासून सांगितले की, ‘‘होय, मी केशव बळीराम हेडगेवार सांगतो की हे हिंदुराष्ट्र आहे!’’
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रकार्यात आजन्म ब्रह्मचारी व्रताचा स्वीकार केला होता. स्वातंत्र्यचळवळीत भाग घेणार्या सर्व मार्गांतील लोकांबद्दल त्यांच्या मनात प्रेम व जिव्हाळा होता. १९२३ मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुटकेसाठी झालेल्या नागपुरातील जाहीर सभेत डॉक्टर हेडगेवार यांनी ‘सावरकरांना एकतर्फी पुराव्यांच्या आधारावर शिक्षा झालेली असल्यामुळे त्यांची त्वरित सुटका व्हावी’ या आशयाचे जोरदार भाषण केले.
डॉ. हेडगेवार आता वेगळ्याच चिंतनात गढले होते. जितुका भोळा भाव, तितुका अज्ञानाचा स्वभाव| अज्ञाने तरी देवाधि देव, पाविजेल कैसा| अशा परिस्थितीत अडकलेल्या हिंदू समाजाची असंघटितपणामुळे फारच दुर्दशा झाली होती. कलकत्त्यात असताना पुलीनबिहारी दास यांच्या आखाड्यावर सातशे मुसलमानांच्या जमावाने हल्ला केला होता. त्यांच्या आखाड्यावरील तरुणांनी तो यशस्वीपणे परतवून लावला. पण शांततापूर्ण जीवन जगू पाहणार्या हिंदू वस्तींवरही असेच हल्ले होत. नागपुरात चौकांवर गाईंची हत्या केली जात असे. मशिदीवरून सवाद्य मिरवणूक नेली तर ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा देऊन तीवर हल्ला होत असे.
अशा या हल्ल्यांना प्रतिकार होतच नसे असे म्हणता येणार नाही. पण ती एक प्रतिक्रिया असे. हिंदू संघटित झाले तर त्यांच्याकडे वाकड्या डोळ्याने पाहण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही अशा प्रकारचे विचार डॉ. हेडगेवार यांच्या मनात घोळू लागले.
१९२५ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यांच्या काही सहकार्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. महिशासुराचे मर्दन दुर्गेने केले तो हाच दिवस. रावणाचे, चौदा चौघड्यांच्या सम्राटाचे श्रीरामाने एका बाणाने पारिपत्य केले तो हाच दिवस. विराटाच्या गाई पळवून लावणार्या दुष्ट कौरवांना पराक्रमाचे पाणी पाजणार्या पराक्रमी अर्जुनाच्या विजयाचा हा दिवस. हिंदू राष्ट्राला जागृत करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणताही दिवस असू शकत नाही.
डॉ. हेडगेवार यांनी सुरुवातीला संघटनेची घटना इत्यादीवर चर्चा न करता तरुणांना शारीरिक, लष्करी व राजकीय शिक्षण द्यावे हाच प्रमुख कार्यक्रम राबवला होता. म्हणूनच सर्व प्रकारच्या चळवळींतून तावूनसुलाखून निघालेल्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी दैनंदिन शाखा हा उपाय शोधून काढला. शरीरसौष्ठवासाठी व्यायाम, मैत्रीच्या वर्धनासाठी खेळ, शिस्तीसाठी कवायत, देशभक्तीपर गीताचे सामूहिक गायन व शेवटी प्रार्थना हा दैनंदिन शाखेचा तासभराचा कार्यक्रम. हा इतका यशस्वी ठरला की आजही रा. स्व. संघाच्या शाखेला दुसरा कोणताही पर्याय नाही.
स्वामी विवेकानंदांनी हिंदू संघटनेची आवश्यकता प्रतिपादिली होती. त्याचप्रमाणे ‘एकाच ठिकाणी राहू नका, सर्वत्र पसरा’ असा संदेशही अनुयायांना दिला होता. डॉक्टर हेडगेवार यांनी रा. स्व. संघाची स्थापना करून स्वामीजींची इच्छापूर्ती केली. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवकांना सर्वदूर पाठवून रा. स्व. संघाच्या कामाचे जाळे देशभर पसरवले. अतिपरिश्रमामुळे १९४० साली त्यांचे एकावन्न वर्षांचे असताना निधन झाले. त्यावेळी नागपूर येथे प्रशिक्षणासाठी जमलेल्या संघ शिक्षा वर्गात देशातील प्रत्येक प्रांतातून स्वयंसेवक आले होते. निधनसमयी ते म्हणाले की, मी आज हिंदू राष्ट्राचे छोटे स्वरूप पाहत आहे… आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य देशाच्या कानाकोपर्यांत पसरले आहे. परदेशातही संघाच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संघाच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत काम करणार्या संघटना आज उभ्या आहेत. या सर्वदूर पसरलेल्या कार्याचे प्रेरणास्थान आहे परमवैभवाचे क्रांतदर्शी डॉ. केशव बळीराम हेडगेवार.

