पद्मविभूषण पं. बिरजू महाराज यांचे निधन

0
19

>> वयाच्या ८३व्या वर्षी घेतला अखेरचा श्‍वास; कथक नृत्य विश्‍व व शिष्यवर्गावर शोककळा

भारतीय कथक नृत्याला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणारे प्रसिद्ध कथक नर्तक पद्मविभूषण पं. बिरजू महाराज (८३) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बिरजू महाराज यांनी रविवारी मध्यरात्री दिल्लीतील आपल्या निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. दिल्ली येथे काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यातील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

दिल्लीतील गुलमोहर पार्क स्थित निवासस्थानी रविवारी रात्री अचानक पं. बिरजू महाराज यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असे होते. कथक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. तसेच पं. बिरजू महाराज हे एक गुरू, नृत्यकार, कोरिओग्राफर आणि संगीतकार होते. एवढेच नव्हे, तर ते वाद्य वाजवायचे, कविता लिहायचे आणि चित्रे सुद्धा काढायचे. त्यांचे अनेक शिष्य आता सुप्रसिद्ध कलाकार आहेत आणि जगभर पसरलेले आहेत. नृत्य-नाट्याला नवे आयाम जोडून त्यांनी कथक नृत्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरू आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथक नर्तक होते.

बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास सन्मानही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली होती. २०१२ मध्ये त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य नृत्यदिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच २०१६ मध्ये बाजीराव मस्तानीतील नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळालाहोता.

पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
पं. बिरजू महाराज यांच्या निधनाची बातमी कळताच अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारतीय नृत्य कलेची जगभरात विशेष ओळख निर्माण करणार्‍या पं. बिरजू महाराज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. त्यांच्या जाण्याने नृत्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. दु:खाच्या या काळात त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या संवेदना आहेत, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

पं. बिरजू महाराज यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दु:ख झाले. या दु:खाच्या समयी त्यांचे कुटुंबीय, शिष्य व अनुयायांप्रती माझ्या संवेदना आहेत. ईश्‍वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

  • दिगंबर कामत,
    विरोधी पक्षनेते.

शिष्यांकडून बंदीश गाऊन अखेरचा निरोप
पं. बिरजू महाराज यांचे पार्थिव दिल्लीतील गुलमोहर पार्क स्थित निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. यावेळी अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्य दर्शन घेतले. त्यानंतर दिल्लीतील लोधी मार्ग स्थित स्मशानभूमीत काल सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या शिष्यांनी बंदीश गाऊन त्यांना शेवटचा निरोप दिला.