Home बातम्या पत्रकारितेचा दर्जा खालावतोय

पत्रकारितेचा दर्जा खालावतोय

0
गोवा श्रमिक पत्रकार तथा ‘गुज’ व वन वर्ल्ड संस्था यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘कर्तव्यदक्ष पत्रकारिता’ या विषयावरील परिसंवादात मुख्यमंत्री बोलत होते. राजकारण्यांचे काही चुकल्यास जनता त्यांना योग्य तो धडा शिवतात. एकेकाळी, इंदिरा गांधीनाही जनतेने धडा शिकविला होता. राजकारण्यांना निवडणुकीला सामोरे जावे लागते. त्यामुळे ते जनतेला बांधील असतात, असे पर्रीकर यांनी सांगितले. ज्ञान व शिक्षण हे वेगळे असते. आपली आई चौथी शिकली होती. परंतु तिचे ज्ञान आपल्यापेक्षा चारपटींनी अधिक होते. राज्याचा कारभार सांभाळीत असताना त्याकाळी ती काय सांगत होती याचा प्रत्यय येत आहे, असे ते म्हणाले.

सकारात्मकतेने पत्रकारिता करावी : उज्वल निकम

प्रसार माध्यमांनी पत्रकारिता करताना समाजावर काय परिणाम होतो याचा विचार केला पाहिजे. काय प्रसिध्द करू नये, हे पत्रकारांना कळले पाहिजे. या पार्श्‍वभूमीवरच सर्वोच्च न्यायालयाने पत्रकारांना स्वत:च बंधने घालून घेण्याचे सूचित केले आहे, असे प्रसिध्द वकील ऍड्. उज्वल निकम यांनी सांगितले. 
कोणत्याही चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेऊनच पत्रकारांनी काम केले पाहिजे. पत्रकारितेवर सामान्य लोकांचा विश्‍वास असतो. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक दृष्टीकोनातून काम करावे, असा सल्ला निकम यांनी दिला.

पत्रकारितेवर सरकारचे नियंत्रण लोकशाहीला मारक : लाटकर

पत्रकारितेवर राज्य सरकारचे नियंत्रण असणे हे लोकशाहीसाठी धोक्याचे आहे. पत्रकारांना मिळालेला जो अधिकार आहे तो जनतेने दिलेला अधिकार आहे. त्यामुळे तो जनतेसाठीच वापरला पाहिजे, असे ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी सांगितले. मुक्त पत्रकारितेत काही गोष्टी चांगल्या होतात तर ाकही वाईट असतात. परंतु नियंत्रित पत्रकारारितेत सर्वच परिणाम वाईट असतो, असे लाटकर यांनी सांगितले.

पत्रकारांनी आमिषाला बळी पडू नये : पाडगावकर

पत्रकारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सत्य बातम्याच दिल्या पाहिजेत, असे सांगून त्यात स्वत:ची मते मांडू नये, अशी सूचना टाइम्स ऑफ इंडियाचे सल्लागार संपादक दिलीप पाडगांवकर यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे पत्रकारितेत बदल झाला आहे. काही राजकीय नेते पत्रकारिता आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतात, त्याचा परिणाम वाईट होतो, अशा प्रसंगी पत्रकारांनी पारदर्शकता बाळगूनच पत्रकारिता करावी, असे पाडगांवकर यांनी सांगितले. गुजचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर यांनी स्वागत केले. वन वर्ल्डचे अध्यक्ष डॉ. केदार पडते यांनी सूत्रसंचलन केले. यावेळी त्यानी आपण डॉक्टर बनल्यानंतर एका मृतवत बालकाला ४५ मिनिटांचा परिश्रम व विश्‍वास याच्या बळावर कसे वाचविले याचे उदाहरण दिले.