Home बातम्या पण पुढे काय?

पण पुढे काय?

0

राजकीय पक्षस्थापनेचे वेध लागलेल्या अण्णा हजारेंनी आपले आंदोलन गुंडाळले आणि त्यांची जागा बाबा रामदेव यांनी घेतली. केवळ सामाजिक आंदोलन चालवू म्हणणारे अण्णा राजकीय पक्षस्थापनेची भाषा करतात आणि ‘भारत स्वाभिमान’ द्वारे गोव्यातून लोकसभेच्या निवडणुका लढवून राजकीय पक्ष स्थापन करू असे काही वर्षांपूर्वी सांगणारे बाबा रामदेव आंदोलनाचा मार्ग पुकारतात असे वेगळे चित्र आज निर्माण झालेले आहे. दोघांचेही इरादे नेक आहेत, तळमळ सच्ची आहेत याविषयी काहीही शंका नाही. दोघांचे मार्ग भिन्न असले तरी भ्रष्टाचारमुक्त भारत हे दोहोंचेही अंतिम उद्दिष्ट आहे. परंतु तरीही या दोन चळवळी एकत्र येऊ शकत नाहीत, शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. अण्णांभोवतीची बुद्धीवाद्यांची ‘टीम’ त्यांना बाबा रामदेव यांच्याकडे फिरकू देणार नाही आणि बुद्धिवाद्यांची राजकीय उद्दिष्टे बाबा रामदेवांना मानवणार नाहीत. दोन्हींच्या पाठीशी जनशक्ती आहे हे वारंवार दिसून आले आहे. जनतेला बदल हवा आहे. देशात मातलेल्या भ्रष्टाचाराने, गैरकारभाराने ती उबगलेली आहे, महागाईच्या मार्‍यात होरपळते आहे. तिला बदल हवा आहे. पण बदल म्हणजे नेमके काय याबाबत ना तिच्या मनात स्पष्टता आहे, ना तिच्या बळावर आंदोलने पुकारणार्‍या नेत्यांच्या मनात.

समर्थकांच्या प्रचंड तांड्यासह आंदोलन पुकारणे आणि ते यशस्वी करून दाखवणे येथपर्यंत ठीक आहे. दोघांनीही देशामध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची एक प्रचंड चेतना जनतेमध्ये निश्‍चितपणे जागवली आहे. परंतु रस्त्यावर उतरलेल्या समर्थकांच्या ‘भारत माताकी जय’ च्या घोषणांपलीकडे काय? या दोन्ही आंदोलनांची पुढची दिशा अस्पष्ट आहे आणि म्हणूनच या जनआंदोलनांना मर्यादा पडते आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आपल्या आंदोलनाला राजकीय उद्दिष्टे नाहीत असे सांगणार्‍या रामदेव बाबांच्या व्यासपीठावर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सारे धुरंधर नेते काल अचानक अवतरले. तिकडे मुुलासिंहांपासून मायावतींपर्यंत सारेच म्हणू लागले आहेत की भ्रष्टाचार मिटला पाहिजे ही आमचीही मागणी आहे. अरे, मग भ्रष्टाचार करते आहे तरी कोण? विदेशांत काळा पैसा दडला आहे तो कोणाचा? केवळ कॉंग्रेस पक्षच भ्रष्टाचारात गुंतलेला आहे आणि इतर सर्व राजकीय पक्षांचे नेते धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत असे कसे बरे म्हणावे? राजकीय भ्रष्टाचारामध्ये सर्वांचाच काही ना काही वाटा आहे. त्यामुळे एकीकडे अण्णांच्या आंदोलनाला राजकीय पक्षाचे रूप दिल्याने त्याची आजवरची पक्षातीत प्रतिमा उद्ध्वस्त झालेली आहे. आता बाबा रामदेव यांच्या आंदोलनालाही राजकीय रंग मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा आंदोलनांमध्ये पक्षीय राजकारण शिरले की त्यांचा विचका ठरलेलाच. त्याला केवळ राजकीय साठमारीचे रूप येते. अशा वेळी तोंडघशी पडते ती अशा आंदोलनाच्या पाठीशी उभी राहणारी आम जनता. अण्णांच्या आंदोलनाच्या अपमृत्यूने एकदा त्यांच्या पाठीशी उभी ठाकलेली जनता सपशेल तोंडघशी पडली. कार्यकर्ते तर एवढे नाराज झाले की अण्णांचे पुतळेही काही ठिकाणी जाळले गेले. आता बाबा रामदेव यांच्या आंदोलनाच्या बाबतीत त्यालाही राजकीय रंग मिळणार असेल तर त्याची पुढील दिशा कोणती असेल? बिगर राजकीय रूपामध्ये एखादी लोकचळवळ या देशात उभीच राहू शकत नाही असा या सार्‍या घडामोडींचा अर्थ घ्यायचा का? सार्‍यांना शेवटी राजकीय ईप्सितेच जर असतील तर त्या चळवळींचे पुढे काय होणार? पक्षीय राजकारणाच्या भोवर्‍यात एकदा अडकली की चळवळ नामशेष झालीच. राजकारणी तिचा राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याच्या प्रयत्नाला लागणारच. भारतीयांचा विदेशांतील काळा पैसा परत आणला पाहिजे अशीच जर सर्व राजकीय पक्षांची भूमिका असेल तर सांसदीय व्यासपीठावर ती मागणी धसास लावण्याचा एकजुटीने प्रयत्न व्हायला काय हरकत आहे? परंतु त्या विषयात अनेकांचे हितसंबंध दडलेले आहेत. विदेशांतील काळा पैसा परत आणण्याचा प्रयत्न केला तर आपली खुर्ची जाऊ शकते हे सत्ताधार्‍यांना ठाऊक आहे आणि विरोधकांचीही ती मागणी धसास लावण्याची इच्छाशक्ती दिसत नाही. रस्त्यावरच्या आक्रोशातून मग साध्य काय होणार?