Home बातम्या पणजी-वास्को फेरीबोट सेवेचा प्रस्ताव

पणजी-वास्को फेरीबोट सेवेचा प्रस्ताव

0

(बबन भगत याजकडून)

पणजी-वास्को जलमार्गावर जलद फेरीबोट सेवा सुरू करण्याचा नदी परिवहन खात्याचा विचार असून त्यासाठी खात्यातर्फे लवकरच एका सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती खात्यातील एका अधिकार्‍याने दिली.

सल्लागाराची निवड करण्यासाठीची प्रक्रिया महिनाभरात सुरू होणार असल्याची माहितीही या अधिकार्‍याने दिली.

एकदा सल्लागाराची निवड झाल्यानंतर या प्रस्तावित फेरीबोटीच्या शक्याशक्यतेबाबतचा जो अहवाल तो देईल त्यावर ही फेरी सेवा सुरू करायची की नाही याचा निर्णय खाते घेऊ शकणार असल्याचे या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

लांब पल्ल्याचा असा हा मार्ग असल्याने ही फेरीसेवा सुरक्षित असू शकेल काय, या जलद फेरीसेवेचा वेग किती ठेवता येईल, दिवसाला किती फेर्‍या मारता येतील, त्यासाठी कशा प्रकारची फेरीबोट लागेल आदी सर्व तपशील असलेला अहवाल सल्लागाराकडून मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया हाती घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या अर्थसंकल्पातून या फेरीसेवेची घोषणा केली होती, असे या अधिकार्‍याने सांगितले. यापूर्वी दोनापॉल ते हरबर या मार्गावर फेरीबोट सेवा होती. नंतर २००२ साली ती बंद पडली. ही फेरीबोट सेवा बंद पडण्यास तशी विविध कारणे होती. मात्र, प्रवाशांचा अभाव हे सर्वांत महत्त्वाचे कारण होते, असे सदर अधिकार्‍याने नमूद केले. दरम्यान, नदी परिवहन खात्याने ४ फेरीबोटी बांधण्याचे कंत्राट दिले होते. त्यापैकी ३ खात्याला यापूर्वीच मिळालेल्या असून पुढील १५ दिवसांत चौथी व शेवटची फेरीबोट मिळणार असल्याची माहितीही सदर अधिकार्‍याने दिली. मिळणार असलेली फेरीबोट मडकई मार्गावर घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.