महापालिकेतील भाजपा समर्थित गट अल्पमतात गेल्यानेच ही निवडणूक लोकशाहीचा खून पाडत लांबणीवर ढकलण्यात आल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला. त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना झाल्या प्रकाराची माहिती दिली. कॉंग्रेस आमदारांनी विधानसभेतही या विषयावरून गदारोळ माजवून सभात्याग केला.
महापौर व उपमहापौर पदांसाठीही आरक्षण ठेवले जावे अशी मागणी पुढे आल्याने त्यासंबंधी निर्णय घेण्यास सरकारला वेळ मिळावा यासाठी ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याचे कारण आयुक्तांनी पुढे केले असले तरी महापालिकेतील विरोधी गटाने ते अमान्य करीत भाजपविरोधी गटाचा महापौर व उपमहापौर निवडून येण्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागल्यानेच ही निवडणूक लोकशाहीस हरताळ फासून लांबणीवर टाकण्यात आल्याचा आरोप केला.
काल विधानसभेत कॉंग्रेस आमदारांनी या विषयावरून गदारोळ माजवला व सभात्यागही केला. भाजपा आमदारांशी त्यांची शाब्दिक चकमकही झडली. मात्र, नंतर विधानसभेचे कामकाज पूर्ववत सुरू झाले. महापालिकेच्या संदर्भात सरकारने जे काही केले, त्याची दखल जनताच घेईल. आम्ही विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय आणणार नाही, अशी भूमिका विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांनी मांडली.
या निवडणुकीसाठी सज्ज झालेल्या व आपल्या गटातील महापौर व उपमहापौरांची निवड करण्यासाठी एकत्र आलेल्या बाबुश मोन्सेर्रात समर्थक गटातील सोळा नगरसेवकांनी काल राज्यपाल भारतवीर वांच्छू यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली व सरकारने अलोकशाही मार्गाने महापालिकेची महापौर व उपमहापौर निवड रद्द केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली येऊनच महापालिका आयुक्तांनी ही निवडणूक रद्द केल्याचा आरोप या नगरसेवकांच्या गटाने राज्यपालांकडे केला. सुरेंद्र फुर्तादो यांनी या नगरसेवकांच्या गटाचे नेतृत्व केले. जनतेकडून आलेल्या सूचनेनुसार पणजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आरक्षण करता यावे यासाठी पालिका कायद्यात आवश्यक ती दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी बाबूश मोन्सेर्रात यांच्या निवासस्थानी झालेल्या सोळा नगरसेवकांच्या गटाच्या बैठकीत महापौरपदी नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो यांची, तर उपमहापौरपदी बेंतो फर्नांडिस यांची निवड करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, या गटाला शह देण्यासाठीच ही निवडणूक रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काल सकाळी दहा वाजता महापालिकेत ही निवडणूक होणार होती. त्यामुळे सुरेंद्र फुर्तादो यांच्या नेतृत्वाखालील सोळा नगरसेवक निवडणुकीसाठी महापालिकेत काल सकाळी गेले असता ही निवडणूक पुढे ढकलण्यात येत असल्याची नोटीस जारी करण्यात आल्याचे त्यांना आढळून आले. विशेष म्हणजे महापालिका आयुक्त संजित रॉड्रिग्स यावेळी कार्यालयात अनुपस्थित राहिले होते.
आयुक्तांकडून लोकशाहीचा खून : रेजिनाल्ड
पणजी महापालिकेसाठी महापौर व उपमहापौर यांची निवड करण्यासाठी २० रोजी होऊ घातलेली निवडणूक रद्द करून महापालिका आयुक्तांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप काल कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी पत्रकार परिषदेतून केला.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या दबावाखाली येऊन महापालिका आयुक्तांनी हे पाऊल उचलल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. निवडणूक रद्द करून कायद्यात दुरुस्ती करण्याची भाषा करणार्या मुख्यमंत्र्यांना काय म्हणावे, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
ही निवडणूक रद्द करून मनोहर पर्रीकर यांनी मोठी चूक केलेली असून त्याची नैतिक जबाबदारी सांभाळून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. होऊ घातलेली निवडणूक रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना कुणी दिला असा प्रश्नही त्यांनी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही निषेध
दरम्यान, पणजी महापालिकेसाठीच्या महापौर व उपमहापौर या पदासाठी काल होऊ घातलेली निवडणूक सरकारने रद्द केल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसने काल येथे घातलेल्या पत्रकार परिषदेतून निषेध केला. सरकारची ही कृती लोकशाही विरोधी असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष निळकंठ हळर्णकर व ट्रॉजन डिमेलो यांनी पत्रकार परिषदेतून केली.
विजय आपलाच होता – टोनी
महापौरपदाची निवडणूक झाली असती तर आपलीच महापौरपदी निवड झाली असती. बहुमत आपल्याच बाजूने होते, असा दावा भाजप समर्थित उमेदवार टोनी रॉड्रिगीस यांनी केला. निवडणूक पुढे ढकलण्याच्या प्रश्नावर आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे रॉड्रिगीस यांनी सांगितले.
नर्णय लोकशाहीविरोधी – फुर्तादो
यापूर्वी आपण व आपल्या पत्नीने भाजप गटाला पाठिंबा दिला होता, पण सरकारने घेतलेला निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय आलोकशाही पद्धतीचा असल्याचे मोन्सेर्रात गटाचे महापौरपदाचे उमेदवार सुरेंद्र फुर्तादो यांनी सांगितले. सरकारच्या या धोरणाचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
ही भाजपच्या अस्ताची नांदी – बाबूश
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लोकशाहीचा खून केल्याचा आरोप करून महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक पुढे ढकलण्याच्या त्यांच्या या निर्णयामुळे पणजीत भाजपचा अस्त होण्याची नांदी सुरू झाल्याचे सांताक्रूजचे आमदार आंतानसियो मोन्सेर्रात यांनी सांगितले.

