पणजी मनपा नव्या ‘स्पा’ना परवाने देणार नाही : महापौर

0
19

पणजी महापालिकेच्या काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत महापालिका क्षेत्रांत यापुढे नव्या ‘स्पा’ना परवाने न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती काल पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेर्रात यांनी दिली. ‘स्पा’मध्ये नको असलेले गैरव्यवहार चालू असल्याचे आरोप समाज माध्यमांवरून होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले.

राज्यातील ‘स्पा’साठी गोवा सरकारने लवकरच एक धोरण तयार करावे, अशी मागणी महापालिका गोवा सरकारकडे करणार असल्याचे मोन्सेर्रात यांनी यासंबंधी पुढे बोलताना स्पष्ट केले. सरकारने ‘स्पा’साठीचे धोरण तयार केल्यास सध्या ‘स्पा’च्या नावाखाली जे गैरप्रकार चालू आहेत ते बंद होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारने एकदा ‘स्पा’साठीचे धोरण तयार केले की धोरणात नमूद करण्यात आलेल्या गोष्टींनुसारच ‘स्पा’ मालकांना सगळे काही करावे लागणार असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. त्याशिवाय सरकारने या ‘स्पा’ची वेळोवेळी तपासणी करण्याचेही काम हाती घ्यावे, अशीही महापालिकेची मागणी असल्याचे मोन्सेर्रात यांनी स्पष्ट केले. पणजीत सध्या सुमारे 20 ते 30 ‘स्पा’ असल्याची माहितीही मोन्सेर्रात यांनी
दिली.