बंदर कप्तान खात्याने पणजी महापालिकेच्या परवानगीशिवाय पणजी जेटीवर बांधकाम सुरू केलेले असून ते बंद करण्याचा त्यांना आदेश द्यावा अशी सूचना करणारे एक पत्र पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी महापालिका आयुक्तांना पाठवले आहे. या जेटीचे बांधकाम करणार्या बंदर कप्तान खात्याने मोडलेल्या बांधकामाचा ढिगारा रस्त्याच्या बाजूला टाकला असून त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे, असे फुर्तादो यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.
पणजी महापालिकेच्या कार्यक्षेत्रात जो ब्राह्यविकास आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे त्यात बंदरे व जेटी यांचा पणजी महापालिका कार्यक्षेत्रात समावेश करण्यात आला असल्याचे फुर्तादो यांनी आयुक्तांच्या नजरेस आणून दिले आहे. पणजी महापालिका कायदा २००२ मधील कलम २६४ व २६५ खाली कॅप्टन ऑफ पोटर्सने वरील बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घ्यायला हवी होती. मात्र, ती त्यांनी घेतली नसल्याने हे काम लांबवण्याचा त्यांना ताबडतोब आदेश द्यावा, अशी सूचना फुर्तादो यांनी या पत्रातून केली आहे.