पणजी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या शेवटच्या दिवशी काल समीर केळेकर व सदानंद वायंगणकर या दोघा अपक्ष उमेदवारांनी निर्वाचन अधिकारी साबाजी शेटये यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सादर केले. भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवारांसह एकूण सात उमेदवारांनी या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून सिद्धार्थ कुंकळयेकर तर कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून सुरेंद्र फुर्तादो यांनी उमेदवारी दाखल केली आहे. वीरेंद्र दिवकर हेही एक अपक्ष उमेदवार आहेत. अर्जांची छाननी उद्या होणार असून येत्या ३० रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. या मतदारसंघातील एकही केंद्र संवेदनशील अथवा अतिसंवेदनशील नसल्याचे शेटये यांनी स्पष्ट केले.

