पणजीत ५ पासून विज्ञान संमेलन

0
123

नामवंत वैज्ञानिकांचा सहभाग; प्रदर्शनाचेही आयोजन
५ ते ८ फेब्रुवारी या दरम्यान पणजीत भारतीय विज्ञान संमेलन व प्रदर्शन होणार असल्याचे या संमेलनाच्या आयोजन समितीचे अध्यक्ष व गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेट्ये यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. गोवा सरकार व गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने या संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले असून भारतभरातील नामवंत वैज्ञानिक मोठ्या संख्येने या संमेलनाला हजर राहणार आहेत.६ रोजी सुप्रसिध्द अणु वैज्ञानिक डॉ. अनिल काकोडकर यांच्याहस्ते सकाळी १० वा. कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर सभागृहात या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. भारतातील पहिल्या सुपर कॉम्प्युटरचे जनक पद्मभूषण डॉ. विजय भाटकर, संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर तसेच मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे यावेळी हजर असतील.
‘मेक इन इंडिया’, ‘स्वच्छ भारत’, ‘आधुनिक औषधे’, आयुर्वेद तसेच ‘जागतिक वैज्ञानिक विकासात भारतीय विज्ञानाच्या पाऊलखुणा’ हे या संमेलनातील काही महत्त्वाचे विषय असतील, असे शेट्ये यांनी सांगितले.
या संमेलनात पाच विशेष सत्रे आयोजित करण्यात आलेली असून सामान्य लोकांना रस असेल अशा विषयांवर ती असतील. त्यात ‘भारतीय अवकाश संशोधन संघटना’, पृथ्वी, महासागर व वातावरण, ग्रामीण भारताचा विकास, ‘भारत-सेवा देश ते वस्तू उत्पादन देश’ आदी सत्रांचा समावेश आहे. त्याशिवाय पारंपरिक अवगत ज्ञान व पुरातन विज्ञान असेही एक सत्र असेल व त्याद्वारे भारताचे विज्ञान व तंत्रज्ञानाला कोणते योगदान दिले ते लोकांपुढे ठेवण्यात येईल. अशा प्रकारची तीन सत्रे असतील. भारतातील आघाडीचे वैज्ञानिक मोठ्या संख्येने या संमेलनाला हजर राहणार आहेत.
संमेलनानिमित्त एका विज्ञान प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आलेले असून ते गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर भरवण्यात येणार आहे.