‘गोवा टॉकीज’ संस्थेतर्फे आयोजन
‘गोवा टॉकीज’ या संस्थेतर्फे २० ते २२ फेब्रुवारी या दरम्यान मॅकेनिज पॅलेस येथे एका लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात गोव्यात तसेच भारतात तयार करण्यात आलेल्या लघुचित्रपटांची स्पर्धा होणार आहे.गोव्यात लघुचित्रपट तयार करणार्यांना व्यासपीठ मिळवून देणे, हा या महोत्सवामागील उद्देश असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना अमोल आजगावकर यांनी सांगितले. या महोत्सवात महाविद्यालये व विद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा विभाग असेल. ‘लव्ह गोवा-फिल गोवा’ असा विषय या विद्यार्थ्यांना देण्यात आलेला आहे. त्यांची वेगळ्या गटात स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेसाठी भारतभरातून ८० लघुचित्रपट आले आहेत. परीक्षक म्हणून चित्रपट छायाचित्रकार शर्मद पै रायतुरकर, चित्रपट दिग्दर्शक स्वप्निल शेटकर व मिलरॉय गोईस यांची निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते २० रोजी दुपारी १२.३० वा. महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष दामोदर नाईक हे उपस्थित असतील.
महोत्सवाला २०० प्रतिनिधी अपेक्षित आहेत. उत्कृष्ट चित्रपटाला भेटवस्तू व २० हजार रु. रोख असे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट छायाचित्रकार, उत्कृष्ट संकलक, उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट ध्वनी संकलक, उत्कृष्ट बाल कलाकार, उत्कृष्ट कथा व विशेष ज्युरी पुरस्कार असे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या महोत्सवासाठी प्रवेश मोफत असेल.

