पणजीत १० पासून शिमगोत्सवास प्रारंभ

0
120

>> १८ जून मार्गावरून १४ रोजी मिरवणूक

पणजी शिमगोत्सव समितीतर्फे १४ मार्च २०२० रोजी शिमगोत्सव २०२० चे आयोजन करण्यात आले आहे. शिमगोत्सव मिरवणूक १८ जून मार्गावरून काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीला संध्याकाळी ठीक ४.३० वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे. शिमगोत्सव मिरवणुकीत सहभाग घेण्यासाठी ऐनवेळी कुठल्याही पथकाला प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती पणजी शिमगोत्सव समितीचे अध्यक्ष उद्योगपती श्रीनिवास धेंपे यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
पणजी शहरातील शिमगोत्सवाच्या आयोजनासंबंधी सरकार अधिकारी व शिमगोत्सव समितीचे पदाधिकारी यांची बैठक महानगरपालिका कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर, महापौर उदय मडकईकर, समितीचे अध्यक्ष धेंपे व इतरांची उपस्थिती होती.

१४ रोजी मिरवणूक
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना समितीचे अध्यक्ष धेंपे यांनी सांगितले की, पणजीत शिमगोत्सव १० ते १५ मार्च २०२० दरम्यान साजरा केला जाणार आहे. शिमगोत्सव मिरवणूक संध्याकाळी ४.३० वाजता सुरू करून रात्री ९.३० पर्यत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १८ जून मार्गावरील काकुलो सर्कलजवळून मिरवणुकीला सुरूवात केली जाणार आहे. असेही श्री. धेंपे यांनी सांगितले.

प्रवेश अर्ज आजपासून उपलब्ध
पणजी शिमगोत्सवातील विविध स्पर्धांचे प्रवेश अर्ज आज दि. ५ ते १२ मार्च २०२० पर्यत पणजी महानगरपालिका कार्यालयात उपलब्ध करण्यात आले आहे. समितीतर्फे १० रोजी आझाद मैदानावर गुलालोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिमगोत्सव मिरवणुकीतील विविध स्पर्धांत सहभागी होणार्‍या पथकांच्या प्रमुखांची बैठक १३ मार्च २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता पणजी महानगरपालिकेच्या आवारात घेण्यात येणार आहे. या बैठकीला पथक प्रमुखांनी उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि. १४ रोजी संध्याकाळी ४ वाजता प्रवेश अर्ज स्वीकृती कक्ष बंद केला जाणार आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी ऐनवेळी कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असेही श्री. धेंपे यांनी सांगितले.