महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे महाराष्ट्र परिचय केंद्र, पणजी आणि गोवा कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्चपर्यंत कला अकादमी संकुलात ‘ग्रंथोत्सव २०१३’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमही होणार आहेत. म. प. केंद्राच्या वरिष्ठ सहाय्यक संचालक श्रीमती संध्या गरवारे यांनी येथे म. प. केंद्रात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रंथोत्सवातील तपशील कार्यक्रमांची माहिती दिली.
ग्रंथोत्सवात पुस्तकांची दालने तीन दिवस सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले असतील. ८ रोजी सकाळी १० वाजता कला अकादमीच्या तालीम कक्षात ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कोकण मराठी परिषद, गोवाचे अध्यक्ष ऍड्. रमाकांत खलप यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक तथा समीक्षक प्रा. विश्राम गुप्ते, डॉ. सोमनाथ कोमरपंत व विजय कापडी हे उपस्थित राहतील. सायंकाळी ४ वाजता ख्यातनाम कवी व महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अशोक नायगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कला अकादमीचे अध्यक्ष तथा प्रथितयश कवी विष्णू सुर्या वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. यात महाराष्ट्रातील प्रथितयश कवी प्रवीण बांदेकर तसेच गोव्यातील कवी मंडळी पौर्णिमा केरकर, दादू मांद्रेकर, मीना समुद्र, चित्रा क्षीरसागर, कालिका बापट, आनंद मयेकर, सद्गुरू पाटील व रमेश वंसकर यांचा सहभाग असेल.
९ रोजी सायंकाळी ४ वाजता कला अकादमीच्या कृष्णकक्षात, गोमंतकीय साहित्यातील बदलते प्रवाह या विषयावर प्रा. अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्रा. कृष्णाजी कुलकर्णी, डॉ. सचिन कांदोळकर, नारायण महाले, स्नेहा म्हांबरे, विनय बापट हे वक्ते सहभागी होतील.
१० रोजी सायंकाळी ४ वाजता अकादमीच्या तालीमकक्षात वाचन संस्कृती या विषयावर परिसंवाद होईल. दै. ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू अध्यक्षस्थानी असतील. यात सागर जावडेकर, बबन भगत, रामनाथ पै रायकर, लीना पेडणेकर, सुधीर सबनीस, गणेश जावडेकर, नितीन कोरगावकर व शशिकांत पुनाजी हे वक्ते विचार मांडतील.
संध्या गरवारे यांनी सांगितले की मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि अभिवृध्दीच्या दृष्टीने ग्रंथोत्सव उपक्रम संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच दिल्ली व गोवा अशा ठिकाणी आयोजित केला जातो. हे दुसरे वर्ष आहे. महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे यापुढे नावीन्यपर्ण कार्यक्रम आयोजित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला सहाय्यक माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण उपस्थित होते.

