Home बातम्या पणजीत विविध मार्गांवर लवकरच पे पार्किंग

पणजीत विविध मार्गांवर लवकरच पे पार्किंग

0

काही भागात फ्री पार्किंगचीही सुविधा

पणजी महापालिकेच्या सहकार्याने राजधानी पणजी शहरात वेगवेगळ्या मार्गांवर पे पार्किंग व्यवस्था करण्याची तयारी सुरू असून पुढील दोन महिन्यात ती पूर्ण होऊन या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती वाहतूक अधीक्षक विजय सिंग यांनी दिली.

पे पार्किंगसाठी १८ जून मार्ग, डॉन बॉस्को हायस्कूल जवळील भाग, नगरपालिका बाजार, मिरामार येथील शारदा मंदिरासमोरचा भाग, लेखा संचालनालया समोरील व आयनॉक्स थिएटर परिसर आदी भाग निश्‍चित करण्यात आले आहेत.

संपूर्ण शहरात पे पार्किंग करण्याचा प्रस्ताव नसून काही भाषांमध्ये फ्री पार्किंगची सोय असेल, असे अधीक्षकांनी सांगितले. शहरात सध्या अनेक ठिकाणी वाहनांची गर्दी होऊन अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे शहरातील वाहतूक कशा पद्धतीने सुरळीत करता येईल, यावर अभ्यास चालू असल्याचे त्यांनी सांगितले.

१८ जून मार्ग, डॉन बॉस्को चौक तसेच नगरपालिका मार्केट परिसरात काही ठिकाणी चारचाकी वाहनचालक डबल पार्किंग करत असल्यानेही वाहतुकीची कोंडी होत असते. यावर वाहतूक पोलीस विभागाने कारवाई करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे.