येथील मार्केटजवळ काल सकाळी 8 च्या सुमारास एक कार वेगाने रिव्हर्स आल्याने झालेल्या अपघातात पदपथावरील एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारार्थ बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळामध्ये दाखल करण्यात आले आहे. सदर कारचालक मद्याच्या नशेत असल्याचा संशय आहे. पोलिसांनी त्याची वैद्यकीय चाचणी करून घेतली असून, अहवालाची प्रतीक्षा आहेत. या अपघातात मुकुल जोशी (रा. पणजी मार्केट) हा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी कारचालक साहिल अन्सारी (ताळगाव) याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रस्त्यावर पार्किंगच्या जागे उभी केलेली कार रिव्हर्स घेताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती थेट पदपथावर येऊन एका दुकानाच्या शटरला धडकली. यावेळी पदपथावर उभे असलेल्या दोघांपैकी एकाने कार पदपथावर येत असल्याचे दिसून येताच सुरक्षितस्थळी धाव घेतली, तर मुकुल जोशी हे बाजूला जाणार तोच कारने धडक दिली. ते कार व दुकानाचे शटर यांच्या मध्ये अडकल्याने गंभीररित्या जखमी झाले.

