महापौर फुर्तादोंची माहिती
पणजी महापालिका क्षेत्रातील दर एका प्रभागात यापुढे दर महिन्याला साफसफाई व गटारे उपसण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पणजी हे एक अत्यंत गलिच्छ व घाणीचे शहर बनलेले असून त्यामुळे पर्यटनावरही परिणाम होत असल्याचे दिसून आल्याचे ते म्हणाले. पणजी शहर स्वच्छ करण्याचा आपण विडा उचलल्याचे सांगून महापालिकेच्या मार्केट प्रकल्पातही यापुढे तेथील गाळेधारकांना घाण करू दिली जाणार नसून आपण या मार्केट प्रकल्पाला आकस्मिक भेटी देऊन तेथे घाण करणार्यांवर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. मार्केट प्रकल्पाच्या भिंती व कोपरे पान खाऊन थुंकून लाल व गलिच्छ करण्यात आलेले असून आपण महापौर बनल्यानंतर या भिंतीला रंगरंगोटी करून त्या स्वच्छ करण्यात आल्या होत्या. पण पुन्हा थुंकून त्या घाणेरड्या करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी केवळ पावसाळ्यापूर्वी पणजी शहराची साफसफाई केली जायची. पण आपण महापौर बनताच शहराच्या सफाईचे काम हाती घेतल्याचे सांगून या घडीलाही ते काम चालू असल्याचे ते म्हणाले. आता दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या प्रभागात साफसफाईचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.