पणजीतील वाहतूक कोंडीप्रश्नी 15 ऑक्टोबरपासून मोहीम

0
15

महापौर रोहित मोन्सेरात यांची माहिती; शहरातील अन्य समस्यांवरही तोडगा काढणार

पणजी महानगरपालिका क्षेत्रातील वाहन पार्किंग आणि वाहतूक कोंडी आदी समस्या सोडविण्यासाठी येत्या 15 ऑक्टोबरपासून खास मोहीम हाती घेतली जाणार आहे. शहरातील स्पा, तसेच पहाटेपर्यंत खुल्या ठेवल्या जाणाऱ्या मद्यालयांची पाहणी करून आवश्यक तोडगा काढला जाणार आहे, अशी माहिती महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजी महानगरपालिका मंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
महापौर रोहित मोन्सेरात यांनी पणजीतील ‘साओ टोमे’ परिसरातील मद्य विक्रीची दुकाने पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास विरोध दर्शविला असून, मद्य विक्री परवानाधारक आस्थापनांनी अधिक शिस्त पाळायला हववी. व्यावसायिकांमध्ये शिस्त आणण्यासाठी व्यापार परवाने देताना अतिरिक्त अटी लागू केल्या जातील, असे महापौरांनी सांगितले.

पणजीतील कॅप्टन ऑफ पोर्टस्‌‍ जेटी किंवा जेटीवरील कॅप्टन ऑफ पोर्टस्‌‍ची इमारत यांचे खासगीकरण करायचे नाही. अनेकांनी खासगीकरणाच्या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. या बैठकीत पदपथविक्रेत्यांचे परवाने, स्वच्छता आणि पार्किंग समस्या, वाहतूक कोंडी, व्यावसायिक कार्यक्रम व प्रदर्शनांमुळे होणारा अडथळा, वेगमर्यादेचे फलक आणि नवीन निधी वाटपापूर्वी खर्चाच्या नोंदींना मंजुरी या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्यातून पार्किंग, वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी खास उपक्रम हाती घेतला जाणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.

मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी नगरविकास विभागाला पत्र लिहून कांपाल फुटबॉल मैदान पणजी महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे, असेही महापौरांनी सांगितले. कांपाल येथील मैदान ताब्यात घेऊन ते पुन्हा खुले करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. कांपाल येथील फुटबॉल मैदान गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. नागरिकांना हे मैदान जॉगिंग ट्रॅक आणि पार्किंग क्षेत्राचा वापर करता आला पाहिजे, असेही महापौर म्हणाले.

पाटो येथील खाडीकिनाऱ्यावरील दुरवस्था झालेल्या ‘मँग्रूव्ह बोर्डवॉक’ची सार्वजनिक-खासगी भागीदारीतून दुरुस्ती आणि देखभाल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. दुरुस्ती आणि देखभालीचा खर्च खासगी कंपनी करेल आणि पर्यटकांकडून नाममात्र शुल्क आकारले जाऊ शकते. सीसीपी या कामासाठी एक रुपयाही खर्च करणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले.