Home बातम्या पणजीतील पार्किंग योजनेच्या फाईलवरील स्थगिती उठवावी

पणजीतील पार्किंग योजनेच्या फाईलवरील स्थगिती उठवावी

0

महापौर फुर्तादो यांची मागणी

येथील १८ जून ’ार्ग व चर्च चौकातील पे पार्किंग योजनेची फाईल जिल्हाधिकार्‍यांना स्थगित ठेवण्यास सांगितल्याने पणजी महापालिकेला या योजनेची अंमलबजावणी करणे अडचणीचे झाले आहे, असे सांगून वरील योजनेच्या अंमलबजावणीच्या बाबतीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना कोणाची भीती वाटते असा प्रश्‍न महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.

विधानसभा अधिवेशनापर्यंत वरील फाईल स्थगित ठेवण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी नगर विकास सचिव परिमळ राय यांना केली आहे. पणजी शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. वाहन पार्किंगची समस्या वाढली आहे. शहरातील लोकांच्या भल्यासाठीच आपण पे पार्किंगचा निर्णय घेतला आहे. सरकारही महापालिकेला आवश्यक ती मदत करीत नाही. त्यामुळे जनतेला सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी आपण आपल्या देशभरातील मित्रांची मदत घेत असल्याचे फुर्तादो यांनी सांगितले.

मुख्यमंत्री हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी येथील नागरिकांच्या अडीअडचणींचा विचार करायला हवा होता. विधानसभा अधिवेशनानंतर अन्य कारणे ते सांगतील. त्याचा परिणाम वरील योजनेवर होईल, असे महापौरांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी फाईल स्थगित ठेवण्याची सूचना त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी आपण सार्वजनिक बांधकाम खात्याची गॅरेज, जुंता हाऊसमधील गोदामाची जागा, मासान दी आमोरीम व महापालिकेच्या कार्यालयासाठी जुन्या सचिवालयाची इमारत महापालिकेला देण्याचे प्रस्ताव दिले होते. त्याला प्रतिसाद मिळू शकला नाही, असे फुर्तादो यांनी सांगितले.