Home बातम्या पणजीच्या विकासासाठी २ हजार कोटी मिळणार

पणजीच्या विकासासाठी २ हजार कोटी मिळणार

0

पणजीबरोबरच उपनगरांचाही कायापालट शक्य : महापौर

जवाहरलाल नेहरू शहर विकास योजनेखाली पणजी शहराला सुमारे २ हजार कोटी रु.चा निधी मिळू शकेल व तो दिल्यानंतर पणजी शहराबरोबरच पणजीच्या आसपासच्या उपनगरांचाही कायापालट होणार असल्याचे पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल या प्रतिनिधी बोलताना सांगितले. हा निधी मिळावा यासाठी आपण पणजी शहरासाठीचा डिपीआर तयार करीत असल्याचे ते म्हणाले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखालील जुनरुमसाठीच्या (जवाहरलाल नेहरू शहर विकास योजना) समितीचे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठक होणार असून पणजी शहरासाठीचा नवा डीपीआर या बैठकीत पणजीच्या महापौर या नात्याने आपण समितीचे अध्यक्ष व मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर याना सुपूर्द करणार असल्याचे त्यानी सांगितले.

गेल्या दहा ते सात वर्षांपूर्वी पणजी शहराचा डीपीआर् तयार करण्यात आला होता. तो सुमारे ४०० कोटी रु.चा होता. आता महागाई वाढल्याने तो २ हजार कोटी रु.चा असेल, असे ते म्हणाले. त्या पणजी शहरात आवश्यक तेथे फ्लाय ओव्हर उभारणे, शहरात जागतिक दर्जाची बससेवा उपलब्ध करणे, जागतिक दर्जाचे रस्ते तयार करणे, सांत इनेज नाल्याची साफसफाई करून त्याचा पर्यटनासाठी वापर करणे, फोन्ताईन्हास येथील वारसा घरांची सुधारणा व दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नवी जलवाहिनी घालणे, रायबंदर, मिरामार, राजभवन आदी भागांचा पुर्ण विकास घडवून आणणे यांचा त्यात समावेश असल्याचे फुर्तादो म्हणाले. जवाहरलाल नेहरू शहर विकास योजनेखाली पणजी शहराला वरील निधी मिळावा यासाठी पणजीच्या महापौर या नात्याने आपण आवश्यक ते सगळे काही करणार असल्याचे फुर्तादो म्हणाले.