पणजीतील 28 बीएलओंची जी तडफाफडकी केली आहे, त्यामागे मोठे राजकारण असून, पणजीच्या मतदारयादीत नेपाळींची नावे घुसडण्याचा हा डाव असू शकतो, असा आरोप उत्पल पर्रीकर यांनी काल केला. या प्रकरणाचा पर्दाफाश करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राजधानी पणजी सोडल्यास अन्य कुठल्याही ठिकाणच्या बीएलओंबाबत अशी कारवाई झालेली नाही. त्यामुळे यात काही तरी काळेबोरे आहे अशी शंका बाळगण्यास वाव असल्याचे पर्रीकर यांनी स्पष्ट केले. ज्येष्ठ व अनुभवी अशा बीएलओंना हटवून त्या जागी कनिष्ठ असलेल्या नवख्या बीएलओंची वर्णी लावून त्यांच्यावर दबाव आणून आपले ईप्सित साध्य करून घेण्याचा हा डाव असावा, असे आपणाला वाटत असल्याचे पर्रीकर म्हणाले.
सध्या पणजी व जवळपासच्या भागांत नेपाळींची संख्या वाढली असल्याचे एकंदर चित्र दिसत असून, त्यांची नावे पणजीच्या मतदारयादीत घुसवण्याचा डाव शिजत आहे, असे सांगून आपणाकडे तशा एक-दोन प्रकरणांची तक्रार आली असल्याचे पर्रीकरांनी नमूद केले.
ज्येष्ठ व अनुभवी बीएलओंनी या नेपाळींची नावे मतदारयादीत घालण्यास नकार दिला असावा. आणि त्यामुळेच त्यांना हटविण्यात आले असावे, असा आरोपही पर्रीकर यांनी केला. पणजी महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असून, त्या पार्श्वभूमीवर हे सगळे सुरू झाले असल्याचे पर्रीकर म्हणाले.
स्थानिक नेत्याचे (बाबूश मोन्सेरात यांचे नाव न घेता) वजन आता कमी होऊ लागलेले आहे. त्यामुळे महापालिकेवरील त्यांचे वर्चस्व कमी होऊ लागले आहे, असेही पर्रीकर म्हणाले.