– विजय प्रभू पार्सेकर देसाई, पेडणे
राजधानी पणजीतील कदंब बसस्थानकाचे बांधकाम अनेक वर्षांपूर्वी धेंपे इंजिनियरिंगने पणजी पालिकेसाठी केले होते. श्री. राणेंनी सदर स्थानक कदंबला आंदण दिले आणि कदंबने त्याची ‘अवतीकाय’ करून सोडली. मी सातत्याने त्याबद्दल आवाज उठविला. पण रामा शिवा गोविंदा! शेवटी एकदाचे डायनॅमिक मुख्यमंत्री या राज्याला लाभले. त्यांनी हे बसस्थानक सुधारण्यासाठी आपल्या पहिल्याच कारकिर्दीत पावले उचलली आणि काम सुरू झाले, ते मुख्यमंत्री म्हणजे श्री. पर्रीकर.
सिटी बसस्थानकाची श्री. पर्रीकरांनी फार चांगली आखणी केली होती. मात्र अंमलबजावणी करण्यास कदंब प्रशासन कमी पडले. मूळ आखणीनुसार सिटी बसस्थानक ते मुख्य इमारतीचे प्रवेशद्वार छप्पर घालून जोडले जाणार होते. त्यामुळे पावसात न भिजता मुख्य स्थानकातून सिटी स्थानकात आणि परत जाणे सुलभ होणार होते. पर्रीकरांचा उद्देश कदंबने भुईसपाट केला. सिटी बसस्थानकातून बसेसमध्ये चढउतार करण्यासाठी प्लॅटफॉर्मची सुविधा पर्रीकरांच्या आराखड्यात होती. प्लॅटफॉर्म बांधले, मात्र कदंब महामंडळातील दीडशहाण्यांनी एका बाजूला लोखंडी सळ्या आडव्या घालून वाटच बंद करून टाकली. एका बसमधून उतरून दुसर्या बसमध्ये जाणे प्रवाशांना जिकिरीचे केले. बसेस लोखंडी सळ्यांच्या बाजूने थांबतात. प्रवासी उतरतात आणि नंतर इतर बसेसशी आट्यापाट्या खेळत दुसर्या प्लॅटफॉर्मवर जातात. सुदैवाने मागून किंवा पुढून येणार्या बसमुळे अजून जीवितहानी झालेली नाही.
बसेस प्लॅटफॉर्मला टेकून थांबल्या पाहिजेत. त्यामुळे उतारू सहज प्लॅटफॉर्मवर उतरू शकतो. सळ्या असलेल्या बाजूला बसेस प्लॅटफॉर्मला घासून थांबतात. उतारू कसा उतरणार? सळ्या नसलेल्या बाजूने बसेस प्लॅटफॉर्मपासून अंतर ठेवून थांबतात. मागून दुसरी बस येते. उतारूंनी काय करावे? या सिटी बसस्थानकावरील प्लॅटफॉर्म सध्या सर्व प्रकारचे व्यापार करणार्या गोमंतकीय लोकांनी व्यापलेला दिसतो. उतारुंना प्लॅटफॉर्मच उपलब्ध नाहीत. या फेरीवाल्यांकडून कोण काय खातो याचा खुलासा होईल काय? या सिटी बस स्थानकावर कुठलीही बस कुठून सुटणार हे दाखविणारे तक्ते नाहीत. सिटी बसेसचे वेळापत्रक नाही. गतिरोधक नसल्यामुळे येणार्या जाणार्या बसेसच्या वेगावर नियंत्रण नाही. बसेस एकाच प्लॅटफॉर्मवर येऊन गोंधळ माजवतात. हे बसस्थानक एकमेव अपवाद आहे, जिथे सर्व प्रकारची वाहने अनिर्बंध ये-जा करतात. हल्लीच मी एक ट्रक या बसस्थानकात येताना पाहिला. कुतूहल म्हणून तिथेच थांबलो. हा ट्रक व्हल्कनायझेशन करण्यासाठी आत आला होता. इथे ते करणारे दुकान पण आहे, हे मला त्याच दिवशी समजले. सर्वप्रकारची वाहने अनिर्बंध ये-जा करीत असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन इथे ये जा करावी लागते. तुम्ही उतरत असताना अचानक दुचाक्या मध्येच उपस्थित होतात. प्रवाशांनी काय करावे?
इतर राज्यांत बसेस सोडून इतर वाहने आत आणण्यास परवानगी नसते. पणजी आणि म्हापसा कदंब स्थानक ही गोंधळाची आगारे बनली आहेत. पणजी स्थानकात एन्ट्री आणि एक्झीट पॉईंट आहेत, पण त्यांचे पालन होत नाही. त्यामुळे कुठूनही वाहने ये-जा करतात. या स्थानकावर बसण्यासाठी बाक पण नाहीत. इतर स्थानकांवर खुर्च्या असतात. इथे तर पंखे पण नाहीत.
पणजी सोडल्यास मी सर्व भारतात बसस्थानकांवर गाड्यांचे वेळापत्रक बघितले आहे. येणार्या आणि जाणार्या गाड्यांच्या वेळापत्रकाचे कदंबला वावडे आहे, हे विशेष निरिक्षण.
स्वच्छतेच्या नावाने चांगभलं. एक्झीट पॉईंट ते मिनी डेपो आणि मिनी डेपो ते सुलभ शौचालय घाणच घाण. उठसूट निर्दशने करणार्या कदंब वाहन चालकांना ही घाण का दिसत नाही? आस्थापन सर्व कचरा मिनी डेपोजवळच गटाराबाहेरच टाकून देते. हा कचरा इथेच कुजून तसाच पडलेला असतो. या कचर्यावर महाराष्ट्र, कर्नाटक एसटीचे आणि कदंबचे चालक/वाहक लघवी करून घाणीत भर घालत असतात. लठ्ठ पगार असूनही मुतारीवाल्याला दोन रुपये देणे यांच्या जीवावर येते. इथे दोन प्रसाधनगृह आहेत. एक मुख्य इमारतीत, दुसरे शौचालय. मी मुंबई, बंगलूरसह सर्वत्र पाहिले आहे. मुतारी मोफत, संडास एक रुपया पाण्यासाठी. गोव्यात सर्वत्र सुलभ मुतारी दोन रुपये घेते. संडास पाच रुपये. हे काय चालले आहे? मुख्य इमारतीत असलेल्या प्रसाधनगृहाजवळून जाताना अत्तराचे दिवे जळत असल्याचा सुगंध तुमची घ्राणेंद्रिये तृप्त करतो. इथे सामान ठेवण्यासाठी एक खोली आहे. मात्र ती दाखविणारा दिशादर्शक फलक नाही. इथे अधिकृत हमाल नाहीत. लोकांना सामानाची चढउतार स्वतःच करावी लागते. कदंब वाहक तुम्हाला मुळीच मदत करीत नाहीत. ‘पवळ्यासंगे ढवळा बांधला, गुण नाही पण वाण लागला’ एसटीचे वाहक आपल्या राज्यात हमाल नाही तिथे सामानाची चढउतार करण्यासाठी प्रवाशांना मदत करतात. गोव्यात करीत नाहीत.
सर्वत्र सामीष आणि निरामिष भोजन प्रबंध असलेली उपाहारगृहे असतात. पदार्थांचा आकार आणि किंमत ठरवून दिलेली असते. वजनमाप करण्याची सुविधा उपलब्ध असते. पणजी स्थानक गेली अनेक वर्षे एका उडप्याने बळकावलेले आहे. इथे फक्त उडपी पद्धतीचे जेवण आणि इतर पदार्थ मिळतात. गोवेकर मासेखाऊ, पर्यटक काही फक्त उडपीचेच येत नसतात. मग हा उडपी हॉटेलवाला इथे ठाण मांडून कुणाच्या कृपेने सुखेनैव चरतोय?
प्रत्येक स्थानकावर नियंत्रक (कंट्रोलर) असतो. कदंबचा कंट्रोलर कुठे असतो? कुठे बसतो? कसा दिसतो? प्रवाशांनी तक्रार कुठे करावयाची याचे मार्गदर्शन नाही. संध्याकाळच्या गाड्या आणि रातराण्या न आल्यास कुणाशी संपर्क केला पाहिजे हे गेली बत्तीस वर्षे कदंबने राष्ट्रीय गुपित कसे ठेवले आहे? परीवर्तन कदंबचे पण होणे आवश्यक आहे. मात्र कदंब पूर्णपणे हाताबाहेर गेलेली आहे. सुधारण्यापलीकडे. आता श्री. पर्रीकरांनी परत एकदा कदंब प्रशासनात भाईगिरी करण्याची गरज आहे. जनहितासाठी कोणाला हवी तेवढी ओरड करू द्या. श्री. पर्रीकर काय करू शकतात?
१) कदंब बस स्थानक परत एकदा महानगरपालिकेकडे द्यावे. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न आपोआप सुटेल. कदंब कर्जात बुडालेले आहे. महानगरपालिकेकडे पैसा आहे.
२) कदंब स्थानकावरील सर्व आस्थापनांना कचरा आस्थापनाबाहेर पेट्यांत ठेवणे भाग पाडावे. या पेट्या नंतर महानगरपालिकेने उचलून न्याव्यात. त्यासाठी प्रत्येकी आस्थापनाकडून फी वसूल करावी.
३) डेली व्हेजीस कामावर नेमून लगेच परिसराची स्वच्छता करावी किंवा महानगरपालिकेकला ते काम द्यावे.
४) डेली वेज सिक्युरिटी नेमून प्रवाशांकडून स्थानकात घाण केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
५) जर बसस्थानक महानगरपालिकेकडे देणे शक्य नसल्यास ते ‘सूडा’च्या ताब्यात द्यावे.
६)‘सुडा’ला खास निधी देऊन या स्थानकाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे. ते मूळ स्थानक, मूळ आराखड्यानुसार पत्रे घालून जोडावे.
७) म्हापसा थेट बस काऊंटरजवळ असलेला चर बुजवावा.
८) बसेस सोडून इतर वाहनांना आत येण्यास मनाई करावी.
९) बसस्थानकाच्या आवारातील बेकायदा व्यवसाय बंद करावेत.
१०) प्लॅटफॉर्मवर बसणार्या व्यापार्यांना हाकलून द्यावे.
११) दुकानाबाहेरील फुटपाथावर सामान ठेवण्यास व्यापार्यांना मज्जाव करावा.
१२) वेळापत्रक उपलब्ध करावे.
१३) मुतारी मोफत करावी. स्वच्छता ठेवावी.
१४) बसण्यासाठी रांगेत खुर्च्या ठेवाव्यात.
१५) नियंत्रक काम करताना प्रवाशांना बघण्याचे भाग्य लाभावे.
१६) उपाहारगृहात आणि इतरत्र असलेल्या खाद्यगृहात सामीष आणि निरामिष जेवण/पदार्थ उपलब्ध करावेत.
१७) बसस्थानकावर गतीरोधक उभारावेत. शनिवारी बसस्थानक रस्ता अडवून बसणारे व्यापारी आणि भिकार्यांना हाकलून द्यावे. श्री. पर्रीकरांनी लक्ष घातल्यास निश्चितच राजधानीतील बसस्थानक ए-वन बनेल.