- शरत्चंद्र देशप्रभू
या तिन्ही संस्थांत ज्येष्ठ पणजीकरांची भावनिक गुंतवणूक तीव्रतेने जाणवते. शाश्वत अन् अमूर्ततेच्या सीमारेषेवरील हे नाते चिमटीत पकडणे तसे अशक्यच. सहभागाचा अभाव, परंतु सहजीवनाचा प्रभाव अशी अनाकलनीय संगती, आविर्भाव.
मागच्या काही दिवसांत विविध स्थानिक वृत्तपत्रांत आलेल्या तीन वृत्तांनी लक्ष वेधून घेतले. त्यातली पहिली बातमी होती ‘मांडवी’ हॉटेल बंद होण्याबाबत- ज्याचे संकेत काही कालावधीपूर्वीच दिले गेले होते. दुसरी होती ‘गुजरात लॉज’ बंद करण्याच्या निर्णयाबद्दल अन् तिसरी पणजीत मध्यवर्ती जागेत असलेल्या ‘जुन्ता हाउस’ या जुन्यापुराण्या टोलेजंग इमारतीची पुनर्बांधणी करण्याबाबतची. या तिन्ही वृत्तांची नोंद आजच्या काळात वावरणाऱ्यांनी खास अशी घेण्यासारखी नसली, तरी सत्तरी पार केलेल्या पणजीवासीयांच्याच नव्हे तर परिसरातील रहिवाशांसाठी हा अनपेक्षित आघातच ठरल्याचे त्यांच्या बोलण्यातून, देहबोलीतून प्रतीत होते. पणजीच्या सामाजिक, सांस्कृतिक अन् आर्थिक जीवनात एकेकाळी या तिन्ही घटकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्वाने मोलाचे योगदान दिल्याचे जाणकार अजूनही मानतात. संबंध येवो वा न येवो, या तिन्ही संस्थांत ज्येष्ठ पणजीकरांची भावनिक गुंतवणूक तीव्रतेने जाणवत होती, जाणवत आहे. शाश्वत अन् अमूर्ततेच्या सीमारेषेवरील हे नाते चिमटीत पकडणे तसे अशक्यच. सहभागाचा अभाव परंतु सहजीवनाचा प्रभाव अशी अनाकलनीय संगती, आविर्भाव या ऋणानुबंधात उलगडल्याचे दिसून येत आहे.
पोर्तुगीज शासनाच्या काळापासून नॅशनल थिएटर अन् ‘मांडवी’ हॉटेल म्हणजे पणजीचे मानबिंदू. ‘मांडवी’ हॉटेल जरी सर्वसामान्यांना अप्राप्य असले तरी ‘मांडवी हॉटेल’चे दुरून झालेले दर्शन पण सर्वसामान्यांचे मन उचंबळीत करीत असे. मांडवी नदीच्या निळ्याशार आत्ममग्न प्रवाहाशेजारी उभे राहिलेले ‘मांडवी हॉटेल’ म्हणजे रुबाब अन् शालीनतेचा अनुपम मिलाफ. मांडवी हॉटेलला त्याकाळी सुरक्षिततेची गरज भासत नव्हती. ‘मांडवी’च्या व्यक्तिमत्त्वात एक संयत आत्मभानाची आभा होती, वलय होते. यामुळे पणजीत हे हॉटेल कायम आपले वैशिष्ट्यपूर्ण आदरणीय स्थान राखून राहिले. ही परंपरा मुक्तीनंतर पण चालू राहिली. अकल्पित आलेल्या जीवघेण्या स्पर्धेत पण ‘मांडवी’ हॉटेलने आपले वेगळे अस्तित्व अबाधित ठेवले- व्यावसायिक संघर्ष न करता! पोर्तुगीज काळात मांडवी हॉटेलमध्ये प्रवेश बहुधा अतिमहनीय व्यक्तींना, विशेषतः गव्हर्नर अन् उच्च स्थानावरील प्रशासकीय अधिकाऱ्यांना. ‘मांडवी’चा स्वभावधर्मच असा की त्याला आतिथ्य घेतलेल्यांचे तसेच न घेतलेल्यांचे प्रेम मिळाले. मुक्तीनंतर पर्यटन क्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ अशी क्रांती झाली. किनारी भागात पंचतारांकित हॉटेल्स उभारली गेली. परंतु मांडवी हॉटेलने मांडवी नदीची निरागसता अन् स्थितप्रज्ञता बिंबवलेली, मुरवलेली. यामुळे अभिजात सौहार्दाला तडे गेले नाहीत. ‘मांडवी’खालून कितीवेळा तरी गेलो; परंतु आत जायची संधी कधी मिळाली नाही. यासंबंधी ऐकून असलेल्या गोष्टीबद्दल पण मनात दडपण असे. मांडवी हॉटेलमध्ये प्रवेशाला ड्रेस कोड पण असल्याचे सांगण्यात येत होते. कितीतरी वेळा मुंबईतून आलेल्या नातेवाइकांकडून मांडवी हॉटेलमध्ये नेण्याबाबत इच्छा प्रदर्शित केली जात असे. परंतु वडील या सूचनेकडे बहुधा दुर्लक्षच करणे पसंत करीत. कारण त्यांनी पोर्तुगीज शासनावेळी पाहिलेले ‘मांडवी’ सूट-बूट-टायवाल्यांचे आतिथ्य करणारे. परंतु मुक्तीनंतर ‘मांडवी’ने काळसुसंगत धोरण अवलंबिले. औपचारिकतेतली बंधने सैल करून दर्जेदार कुझिनची परंपरा चालवण्यावर भर दिला. डॉ. करणसिंग म्हणजे काश्मीरचे माजी नरेश. यांनी पण मांडवी हॉटेलमधील खाद्यपदार्थांची, विशेषतः बांगड्यांच्या किसमूरची प्रशंसा मुक्तकंठाने केल्याचे आठवते. अशा या मांडवी हॉटेलात प्रवेश करण्याची संधी मला 1965 साली लाभली. डॉ. विली डिसौझा अन् गोविंद पानवेलकर अनुक्रमे पणजी रोटरी क्लबचे चेअरमन अन् सेक्रेटरी असताना त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘इंटर ॲक्ट क्लब’ची स्थापना केली होती. या क्लबवर डॉन बॉस्को स्कूलतर्फे मी अन् आणखी एक विद्यार्थी प्रतिनिधित्व करत होतो. शिवाय प्रोग्रेस स्कूलमधून संजीव तारकर, तर अवधूत बोरकर पीपल्समधून प्रतिनिधित्व करत होते. या ‘इंटर ॲक्ट क्लब’चे औपचारिक उद्घाटन मांडवीत झाले. तो माझा मांडवीतला पहिला प्रवेश. वलयांकित वातावरण म्हणजे काय असते ते मला कळून चुकले. नंतर क्लबच्या इथेच त्रैमासिक सभा होऊ लागल्या. मजूर प्रशासनात गेल्यावर तर ‘मांडवी’ची वरचेवर भेट होऊ लागली. दरम्यान, सप्ततारांकित हॉटेलशी पण संपर्क आला. परंतु ‘मांडवी’ने मनावर केलेली जादू आटलेली नाही. ‘मांडवी’ने आपला विस्तार पण आपल्या मर्यादा ओळखून केला. आज हा नंदादीप तेवताना दिसत नाही. परंतु ‘मांडवी’च्या हितसंबंधीयांची अजून अपेक्षा आहे की आजच्या गळेकापू स्पर्धेत पण ‘मांडवी’चा फिनिक्स अनोख्या ढंगाने उभारी घेईल, आपल्या उज्ज्वल परंपरेच्या पार्श्वभूमीवर अन् जनमानसाच्या प्रखर इच्छाशक्तीच्या बळावर.
पणजीतील ‘गुजरात लॉज’ पण बंद होत असल्याची वार्ता कानावर आदळली अन् वाटले पणजीतील आद्य खाद्यसंस्कृती आता अस्तंगत होत आहे. 1955 साली कार्यरत झालेल्या या आस्थापनात उपाहारगृहाबरोबरच निवासाची सोय पण अल्प प्रमाणात होती. फोंताइन्यश येथील सुप्रसिद्ध भटाच्या खानावळीतील भोजन सुविधा बंद झाली त्यावेळी गुजरात लॉजने शाकाहारी जेवणाच्या गिऱ्हाइकांना तारले. सव्वा रुपया शुल्क गुजराती पद्धतीच्या जेवणाची थाळी मी येथे चाखली. वैद्यकीय कंपनीचे प्रतिनिधी अन् बाहेरून आलेले छोटे व्यावसायिक यांचे हे हक्काचे आश्रयस्थान. त्याकाळी जुन्ता हाउस म्हणजे शासकीय केंद्रच. शिवाय समोरच स्टेट बँकेची शाखा. याव्यतिरिक्त खाजगी छोटीमोठी आस्थापने. परिसरातील या कर्मचारीवर्गाना ‘गुजरात लॉज’चा दिलासा. जुन्ता हाउसमध्ये कार्यरत असलेल्या मजूर आयुक्तालयात दिवसरात्र औद्योगिक तंटे मिटवण्याबाबत मध्यस्थी चालायची. बहुधा गुजरात लॉजमधूनच चहा, कॉफी, खाद्यपदार्थांचा पुरवठा वाजवी दरात. मध्यस्थीची बोलणी जेवणाच्या वेळेत पण चालायची. अशाच प्रसंगी मधुमेहग्रस्त अधिकारी तसेच खाजगी कंपनीतील उच्चपदस्य कर्मचाऱ्यांना गुजरात लॉजचा फायदा होई. कितीतरी व्यक्ती तणावपूर्वक वातावरणातून सटकत अन् गुजरात लॉजमध्ये जेवण घेऊन वाटाघाटीत परत सहभागी होत. नंतरच्या काळात गुजरात लॉजने नवनव्या संकल्पना अमलात आणून धंद्याला बरकत आणली. आस्थापनासाठी इंचन् इंच जागेचा पुरेपूर उपयोग करून धंदा भरभराटीला आणला. या साऱ्या काळात बदलली नाही ती व्यवस्थापनाची आतिथ्यशीलता अन् संयमी वृत्ती. गुजरात लॉजचे ताक, दही आठवते. आता श्रीखंडाचे हवाबंद डबे पावलोपावली आढळतात. परंतु त्याकाळी श्रीखंडाची आस पुरविली ती गुजरात लॉजने- हे सत्तरी पार केलेले गिऱ्हाईक विसरणार नाही. गुजरात लॉज बंद पडले किंवा नव्या डामडौलात उभारले तरी याचा नव्या पिढीला फरक पडणार नाही. परंतु हयात गिऱ्हाईक- ज्याचे गुजरात लॉजशी स्नेहबंध निर्माण झाले- ते व्यस्त जीवनात पण खचितच एक नकळत उसासा टाकतील अन् सारे विसरून जातील.
‘जुन्तु कुमेर्सियु’ या निम्न शासकीय संस्थेमार्फत उभी राहिलेली ‘जुन्ता हाउस’ ही मला वाटते मुक्तीनंतरची पहिली बहुमजली इमारत. या इमारतीचे बांधकाम बहुधा मुक्तीपूर्व काळातच आरंभले होते. अशाच प्रकारच्या काही इमारती या संस्थेमार्फत वास्को द गामा शहराच्या बायणा विभागात उभारल्या होत्या. यातील सदनिका केंद्र व राज्य सरकार कर्मचाऱ्यांना भाडेतत्त्वावर बहाल केल्याचे आठवते. मुक्तीनंतर ‘जुन्ता हाउस’ची मालकी गोवा शासनाकडे आली. ही भव्य इमारत तीन भागात विभागलेली. नंतरच्या काळात मागच्या भागात याचे विस्तारीकरण झाले. या इमारतीचा उपयोग प्रामुख्याने सरकारी कचेरीसाठी तसेच अधिकाऱ्यांच्या निवासासाठी केला जात असे. कालांतराने निवासासाठी राखीव ठेवलेल्या सदनिकांचे पण सरकारी कार्यालयात रूपांतर झाले. या इमारतीचा वरचा मजला विवेकानंद सोसायटीसाठी राखून ठेवला होता. या विवेकानंद केंद्राने पणजीच्याच नव्हे तर गोव्याच्या कला-संस्कृती विश्वात फार मोठे योगदान दिलेले आहे. येथे संगीत, तबला तसेच हार्मोनिअमचे क्लासेस चालायचे. प्रशिक्षणाअंती विविध परीक्षा पण घेतल्या जात. माझे काही मित्र कै. ज्ञानू बोरकर, मळ्यात राहणारा घाटकर तसेच दीपक नायक यांनी येथे संगीताचे धडे गिरवल्याचे स्मरते. भावे, आप्पासाहेब देशपांडे म्हणजे नूतन गंधर्व यांचे त्यांना मार्गदर्शन लाभल्याचे आठवते. विद्यार्थ्यांना गोलाकार बसवून संगीताचे धडे देण्याची देशपांडे यांची शैली आकर्षक. रागधारीचे विविध कंगोरे उलगडून द्यावे ते आप्पासाहेबांनीच असा वारंवार ज्ञानू बोरकरांकडून उल्लेख व्हायचा. विवेकानंद केंद्राचे त्याकाळी राजाराम हेदे की प्रभाकर आंगले अध्यक्ष असावेत, नक्की आठवत नाही. परंतु येथे झालेली व्याख्याने, मैफली आठवतात. कै. वसंतराव देशपांडे, प्रभुदेव सरदार, जितेंद्र अभिषेकी, सुरेश हळदणकर यांच्या मैफिलींना सभागृह तुडुंब भरून जात असे. गोव्याच्या कानाकोपऱ्यांतून रसिक मोठमोठ्या गवय्यांचे गाणे ऐकण्यासाठी मिळेल त्या वाहनाने, तर परिसरातील रसिक चालत येत. पेडण्यातील नातेवाइकांचा मुक्काम आमच्या बिऱ्हाडी. जुन्ता हाउसपासून चार पावलांच्या अंतरावर. येथे आयोजित केलेल्या व्याख्यानांची अजून डॉ. सोमनाथ कोमरपंत आवर्जून आठवण काढतात. पुरुषोत्तम दारव्हेकर, चित्तरंजन कोल्हटकर यांची भाषणे आठवतात. व्यासपीठावर भाषणादरम्यान स्व. कोल्हटकर अन् माधव गडकरी यांच्यामधला ‘घाशीराम कोतवाल’बद्दलचा वाद आठवतो. ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंतांचा मानाचा मुजरा आठवतो. विविध परिसंवाद आठवतात. यदुनाथ जोशी अन् कॉम्रेड जॉर्ज व्हाज या विभिन्न विचारप्रणाली असलेल्या दोन व्यक्तींमधील वाद आठवतो. जोरकस वितंडवाद पण आठवतो. बुशकोट-शर्टातील व्यासपीठावरून बोलणारे त्यावेळचे रेल्वेमंत्री मधू दंडवते आठवतात. टेरेलिन शर्ट घातलेले, काश्मिरी गुलाबासारख्या अंगकांतीचे कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा जाड भिंगाचा चष्मा घातलेला चेहरा आठवतो अन् लयबद्ध कवितावाचन. किंजवडेकर शास्त्री अन् दत्ता बाळ यांची अध्यात्मावरील प्रवचने आठवतात. मुख्य म्हणजे आंतर कॉलेजीय एकांकिका स्पर्धा आठवतात. डॉ. विनय सुर्लकर, यदुनाथ जोशी, कु. प्रमोद महात्मे, राज कीर्तने, रवींद्र आमोणकर यांनी सादर केलेल्या चक्र, सुलतान, सूड या कोकणी-मराठी एकांकिका अजून आठवतात. रंजना कश्यप, शुभलक्ष्मी मांद्रेकर यांनी अनुक्रमे दिलेले संगीत अन् नृत्य प्रशिक्षण आठवणाऱ्या व्यक्ती भेटतात.
जुन्ता हाउसच्या दर्शनी भागाचा उजव्या बाजूचा पहिला मजला म्हणजे मर्मबंधातील ठेव. 1974- 2003 या प्रदीर्घ काळात- मधला तीन ते चार वर्षांचा कालावधी सोडला तर- इथल्या मजूर आयुक्तालयात विविध पदांवर काम केले. मजूर निरीक्षक ते अतिरिक्त मजूर आयुक्त तसेच कामगार आयुक्ताचा ताबा मला इथल्या कार्यालयात मिळाला. ताबा मिळताच एका महिन्याच्या अवधीत कार्यालयाचे स्थित्यंतर ‘श्रमशक्ती’ या पाटोवरील इमारतीत झाले. दरम्यानच्या कालावधीत कितीतरी थोर व्यक्ती जवळून पाहता आल्या, संवाद साधता आला. केंद्र सरकारमधून आलेले रामचंद्रन, लालचंदानी, सिन्हा अन् शेवटचे मिर्झा आठवतात. साळगावकर ग्रुपचे फेर्रांव, मोहन राव, ‘सेझा’चे साळगावकर, ‘धेंपो’चे अरविंद कर्णिक, रमेश देसाई, लेले, गिरीश सरदेसाई, माधव बांदोडकर, जोग, कुंकळ्ळीकर असे सल्लागार आठवतात. मोहन नायर, गजानन पाटील, जॉर्ज व्हाझ, जेराल्ड परेरा असे धुरंधर कामगारनेत्यांशी येथेच संबंध आला. आक्रमक वृत्तीचे फोंसेका अन् चतुर नीती अवलंबणारे पुती गावकर यांच्या समवेत काम करण्याचा अनुभव आला. नागरी प्रशासनातील अल्पकाळातील आलेले पुखराज बंब, चमनलाल, वामन सरदेसाई, राजशेखर आठवतात. या साऱ्यांमुळे जुन्ता हाउसला माझ्या कार्यकाळात फार महत्त्वाचे स्थान लाभले आहे. या काळात थरारक प्रसंगांशी तोंड द्यावे लागले, तसेच प्रशंसेची पाठीवर थाप पण पडली. कार्यालय साधे होते, परंतु आलेला अनुभव अन् कार्यसंस्कृती श्रीमंत होती.