>> राजस्थानात कॉंग्रेसचे चिंतन शिबिर सुरू
कॉंग्रेस पक्षात आता बदल गरजेचे असून आपण आपल्या कामाची पद्धत बदलली पाहिजे. आपल्या वैयक्तिक अपेक्षांपेक्षा संस्थेला वरठेवण्याची गरज आहे. आजवर पक्षाने आपल्याला भरपूर दिले आहे., आता पक्षाला आपण काहीतरी देण्याची वेळ आली आहे असे कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगितले.
उदयपूर राजस्थानात कॉंग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिरात श्रीमती गांधी मार्गदर्शन करत होत्या. शिबिराचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उदयपूरमध्ये १३ ते १५ मे असे तीन दिवस हे शिबिर चालणार आहे.
सोनिया गांधी यांनी यावेळी भाजप आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली. देशात ध्रुवीकरणाचे वातावरण आणि भीती निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. याशिवाय समाजाचा अविभाज्य भाग असलेल्या आणि समान नागरिक असलेल्या अल्पसंख्याकांना अत्याचारित आणि अनेकदा क्रूरपणे लक्ष्य करण्याचे कार्य सुरू असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. या तीन दिवशीय चिंतन शिबिरात २०२४ लोकसभा निवडणुकीआधी पक्षाला मजबूत करण्याचा मुख्य उद्धेश आहे. शुक्रवारी चिंतन शिबीरामध्ये मार्गदर्शन करताना सोनिया गांधींनी राष्ट्रीय तसंच अर्थपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्याची ही संधी असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी आपण जेव्हा येथून बाहेर पडाल, तेव्हा नवी ऊर्जा आणि नवी प्रेरणा घेऊन बाहेर पडा. देशातील जनतेला कॉंग्रेसकडून मोठ्या आशा आहेत. आपल्याला त्यांच्या आशा पूर्ण करून दाखवाव्या लागतील असे आवाहन केले.
एका घरातून एकच तिकीट
या शिबिरात कॉंग्रेसकडून काही प्रस्ताव मांडण्यात येणार आहेत. त्यात निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेसकडून एका घरातील एकाच सदस्याला उमेदवारी मिळणार असल्याची माहिती कॉंग्रेस नेते अजय माकन यांनी दिली. या शिबिरात राहुल आणि प्रियांका वाड्रा यांच्यासह देशभरातील कॉंग्रेसचे ४३० प्रमुख नेते सहभागी झाले आहेत. राजकारण, अर्थव्यवस्था, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण, पक्ष संघटना, शेतकरी आणि कृषीक्षेत्र तसेच तरुणांशी संबंधित विषयांवर सहा वेगवेगळ्या गटांमध्ये चर्चा करणार आहेत. पाच वर्षांपासून एकाच पदावर असलेल्या व्यक्तीला पायउतार व्हावे लागेल.