पक्षाच्या आमदारांशी बोलूनच राजीनाम्याबाबत निर्णय

0
48

अजित पवार यांचे प्रतिपादन

दुष्काळासंदर्भात वादग्रस्त वक्तव्ये केल्याने चहुबाजूंनी घेरले गेलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय आपल्या पक्षाच्या आमदारांशी चर्चा करून घेऊ असे प्रतिपादन काल एका कार्यक्रमात बोलताना केले. ‘‘गेल्या वेळी जेव्हा मी राजीनामा दिला होता, तेव्हा तो माझा वैयक्तिक निर्णय होता. यावेळी मी ज्या आमदारांनी मला आपला नेता निवडले आहे, त्यांच्याशी बोलूनच निर्णय घेईन’’ असे अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांनी तीन दिवस कामकाज रोखून धरले होते. त्या पार्श्वभूमीवर श्री. पवार बोलत होते.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अजित पवार यांचा जलसिंचन घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप झाल्यानंतर पवार यांनी राजीनामा दिला होता. मात्र, महाराष्ट्र सरकारने श्वेतपत्रिकेत त्यांना क्लीन चीट दिल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आले होते.