पक्षशिस्तीचा भंग प्रकरणी ‘त्या’ आमदारांना नोटीस जारी होणार

0
10

राजस्थानातील गेहलोत समर्थक आमदारांच्या राजीनामानाट्याची कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गंभीर दखल घेतली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सुरू असलेल्या आमदारांच्या राजीनामानाट्यानंतर आणि दबावानंतर अशोक गेहलोत यांचे नाव कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यातीतून वगळले जाऊ शकते. तसेच राजीनाम्याचे नाट्य घडवणार्‍या आमदारांना पक्षशिस्तीचा भंग केल्या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस जारी होण्याची शक्यता आहे.

राजस्थानमधील राजकीय स्थितीवर तोडगा काढण्यासाठी सोनिया गांधी यांनी रविवारी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना जयपूरमध्ये पाठवले होते. काल नवी दिल्लीत सोनिया गांधींसोबत झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी तेथील राजकीय स्थितीची माहिती सोनिया गांधींना दिली. सदर दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती; मात्र गेहलोत समर्थक आमदार त्या बैठकीला गैरहजर राहिले होते. तसेच त्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारले होते. या सर्व परिस्थितीची माकन व खर्गे यांनी सोनिया गांधींना दिली. त्यांनी दोन्ही नेत्यांकडून लिखित अहवाल मागितला असून, त्यानंतरच पक्षशिस्तीचा भंग प्रकरणी सदर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.