पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर काँग्रेसचे आंदोलन

0
10

>> राहुल गांधींकडून आंदोलनाचे नेतृत्व; धर्मेंद्र प्रधानांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी

>> राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात; आंदोलन प्रकरणी नोंदवला एफआयआर

नीट पेपरफुटी आणि दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या अमानुष लाठीमार प्रकरणी काँग्रेस प्रचंड आक्रमक झाली असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस व अन्य पक्षांच्या खासदारांनी काल पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तीन तासांहून जास्त काळ राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना ताब्यात घेतले. नंतर त्या सर्वांना सोडून देण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी राहुल गांधी आणि प्रियांका गांधींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारी कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) संसदेवर काढलेल्या मोर्चामुळे राजधानी दिल्लीसह देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. तसेच देशातील शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा हातात घेत आंदोलन सुरू करणाऱ्या अभिजीत दिपके यांच्या सीजेपीला राजकीय पक्षांकडून मोठा पाठिंबाही मिळत आहे.

नीट पेपरफुटी आणि दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘7, लोककल्याण मार्ग’ निवासस्थानाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. राहुल गांधी यांच्यासोबत वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेही या आंदोलनात सहभागी झाले होते.

काल दुपारी 3.30 च्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला. काँग्रेसने पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर सायंकाळी 4.35 वाजता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे आंदोलन ठिकाणी पोहोचले. त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत 20 मिनिटे चर्चा केली. सिंह यांच्यासोबत केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन हेही उपस्थित होते. दोन्ही नेत्यांमधील चर्चेदरम्यान खासदारांनी घोषणाबाजी केली.

ठिय्या आंदोलन करत असलेल्या काँग्रेसने केंद्र सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत. त्यात पहिली मागणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी होती. केंद्रीय गृहमंत्र्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त निवेदन द्यावे, संसदेमध्ये या विषयांवर सविस्तर चर्चा करावी, विद्यार्थ्यांचे जे विषय आहेत ते ऐकून घ्यावेत आणि मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निष्पक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशा मागण्या काँग्रेसने केल्या.
यानंतर जितेंद्र सिंह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेले. शहा यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी पुन्हा राहुल यांच्याशी संवाद साधला.

3 तासांच्या आंदोलनादरम्यान केंद्र सरकारने राहुल गांधींशी दोनदा चर्चा केली, पण ते सहमत झाले नाहीत. यानंतर, जेव्हा 100 हून अधिक पोलीस आले, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेरले आणि राहुल गांधींपर्यंत पोहोचू दिले नाही.
आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी हात बांधलेले दिसून आले. पोलीस अधिकारीही त्यांना ठिय्या आंदोलन संपवण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न करताना दिसले. पंतप्रधानांचे निवासस्थान हा सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील परिसर मानला जातो. त्यामुळे घटनास्थळी दाखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; मात्र ते आंदोलनावर ठाम राहिले.
यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात अर्धा तास धक्काबुक्की झाली. पोलिसांनी लाठीमार केला. अखेरीस पोलिसांनी राहुल गांधींसह अन्य सर्व नेत्यांना ताब्यात घेऊन बसमध्ये बसवले आणि त्या सर्वांना छत्रसाल स्टेडियममध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तीन तासांच्या कालावधींनतर सर्वांना सोडण्यात आले. काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतल्यानंतर सोनिया गांधी देखील रात्री 9 च्या सुमारास मंदिर मार्ग पोलीस स्थानकात दाखल झाल्या होत्या.

मागण्या कोणत्या?
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या.
आंदोलकांवरील लाठीमाराची चौकशी करा.
अधिवेशनामध्ये नीट पेपरफुटीवर चर्चा करा.
गृहमंत्र्यांनी दोन्ही सभागृहांत निवेदन द्यावे.
विद्यार्थ्यांचे जे विषय आहेत, ते ऐकावेत.

गुप्तता राखत आंदोलन छेडले
हे काँग्रेसचे आंदोलन अत्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह सर्व नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पायी चालत गेले. ते 100 मीटर अंतरावर असताना माध्यमांना या आंदोलनाची माहिती देण्यात आली. आंदोलनस्थळी काँग्रेस कार्यकर्ते पंतप्रधान, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा घोषणा देत होते.

विद्यार्थ्यांवरील हल्ला हा प्रत्येक भारतीय कुटुंबावरील हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाटते की ते उत्तर न देता, परिणामांना सामोरे न जाता सुटू शकतील. ते तसे करू शकणार नाहीत, आणि निश्चितच यावेळी तर नाहीच.

  • राहुल गांधी, विरोधी पक्षनेते.

पोलीस, सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा
काल दुपारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले. सुरक्षा यंत्रणा आणि प्रसारमाध्यमांनी असा समज करून घेतला की, हे नेते केवळ खर्गे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच जमले होते.

पंतप्रधानांचे निवासस्थान खर्गे यांच्या निवासस्थानापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे. बैठक संपताच, सर्व नेते आपापल्या वाहनांमध्ये बसण्याऐवजी अचानक पायी रस्त्यावर उतरले. कमी अंतरामुळे, दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दलांनी (आरएएफ) बॅरिकेड्स लावण्यापूर्वीच काँग्रेस नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर पोहोचले होते.
खर्गे यांच्या निवासस्थानी अनेक खासदार आणि आमदार उपस्थित होते. अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे सरकार, पोलीस यंत्रणेची भंबेरी तर उडालीच; पण काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांसाठी देखील हा धक्का ठरला.

बर्गर खाणे नडले; प्रवक्तेपदावरून हटवले
काल कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) आपल्या एका प्रमुख कार्यकर्त्यावर कारवाई केली. सोमवारी काढलेल्या मोर्चादरम्यान, मोर्चात सहभागी न होता बर्गर खायला गेलेले संघटनेचे प्रवक्ते विजेता दहिया यांच्यावर कारवाई करताना त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली.

काँग्रेस कार्यकर्त्यांची दोनापावला येथे निदर्शने
राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या निषेधार्थ गोवा प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दोनापावल सर्कल येथे काल निदर्शने केली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकभवनाकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.