पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूज येथील जाहीर सभेत बोलत असताना पाकिस्तानमधील नागरिकांना इशारा दिला. पाकिस्तानातून दहशतवाद संपविण्यासाठी तेथील नागरिकांना पुढे यावे लागेल. तरुणांना पुढाकार घ्यावा लागेल. तुम्ही सुखाचे आयुष्य जगा, भाकर खा, नाहीतर माझी गोळी आहेच, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यावेळी मोदींनी 53,400 कोटींच्या विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन केले. शस्त्रविराम झाल्यानंतर मोदींनी पाकिस्तानमधील दहशतवादाच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. आमची मोहीम फक्त सूड घेण्यापूरती मर्यादीत नव्हती, तर माणुसकीला वाचविणे आणि दहशतवाद संपविण्याचा आमचा प्रयत्न होता. पहलगामच्या हल्ल्यानंतर आम्ही 15 दिवस वाट पाहिली. आम्हाला वाटले पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेईल; पण दहशतवादच त्यांचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून आले, असे मोदी म्हणाले.
भारत पर्यटनावर विश्वास ठेवतो, पर्यटन लोकांना जोडते. पण पाकिस्तानसारखा एक देश असाही आहे जो दहशतवादाला पर्यटन मानतो आणि हा जगासाठी एक मोठा धोका आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली. आमचे धोरण दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने हे धोरण अधिक स्पष्ट केले आहे. जो कोणी भारतीयांचे रक्त सांडण्याचा प्रयत्न करेल त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. भारताविरुद्ध डोळे उघडणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही. ऑपरेशन सिंदूर हे मानवतेचे रक्षण करणे आणि दहशतवाद संपवण्याचे ध्येय आहे, असेही मोदी म्हणाले.

