Home बातम्या पंतप्रधानपदाची बस चुकली; राष्ट्रपतिपदाच्या बग्गीत बसणार?

पंतप्रधानपदाची बस चुकली; राष्ट्रपतिपदाच्या बग्गीत बसणार?

0

– सुरेश वाळवे

अखेर लालकृष्ण अडवानी यांना वास्तवासमोर झुकावे लागले आहे. नरेंद्र मोदी यांना तीन महिन्यांमध्ये दोनदा आडवे जाण्याचा प्रयत्न भाजपच्या ‘लोहपुरुषा’ने करून पाहिला. पण ‘दुसर्‍या सरदारा’च्या रेट्यामुळे तो असफल ठरला.

गत जूनमध्ये पणजीत भरलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गुजरातच्या मुख्यमंत्र्यांवर येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी टाकण्यात आली, तिचे सर्रास स्वागत झाले. अपवाद जेडी (यू). नितीशकुमार यांच्या पक्षाने लागलीच रालोआतून बाहेर पडून स्वतंत्र वाट चोखाळली. तेवढा एक अपवाद वगळता मोदींचा मार्ग प्रशस्त झाला. अन् परवा तर भाजपच्या संसदीय मंडळाने त्यांच्या प्रधानमंत्रिपदावर मोहर उठवली. हे शिक्कामोर्तब आणखी किमान तीनचार महिने लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न अडवाणीनी करून पाहिला, परंतु संघाच्या जबरदस्त प्रभावापुढे त्यांची मात्रा चालली नाही.

कालपरवापर्यंत ज्यांची वट चालायची, त्यांचा आज शेणगोळा व्हावा, हा नियतीने उगवलेला सूड आहे की, खुद्द लालजींची विपरीत बुद्धी हे प्रत्येकाने आपल्या मगदुराप्रमाणे ठरवावे. कठोर वस्तुस्थिती ही की, त्यांच्या विरोधाला न जुमानता अध्यक्ष राजनाथ सिंह स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले आहेत. केवळ सहा महिन्यांमध्ये हाही नियतीने केलेला चमत्कार होय. कारण नितीन गडकर्‍यांना पक्षाध्यक्षपदाचा दुसरा कार्यकाळ मिळू नये, याकरिता अडवानींनीच नकाराधिकार वापरून आपल्या पसंतीचा उमेदवार म्हणून राजनाथजींच्या पारड्यात वजन टाकले. त्यांनी भ्रमनिरासच नव्हे तर विश्‍वासघात केला, अशी आज ‘पितामह’ अडवानींची भावना बनल्यास नवल नव्हे. म्हणून त्यांनी गत आठवड्यात अध्यक्षांना पत्र लिहून त्यांच्या कार्यपद्धतीविषयी तीव्र नाराजी व्यक्तविली. तिलाही फारसे महत्त्व दिले गेले नाही, तेव्हा यापुढे कठोर वास्तव मुकाटपणे स्वीकारण्याखेरीज पूर्व उपप्रधानमंत्र्यांपुढे दुसरा पर्याय राहिला नाही. हो, ते आणखी करू तरी काय शकतात? भाजप सोडणार? खासदारकी त्यागणार? जूनमध्ये त्यांनी फुटकळ राजीनामे देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. परंतु सरसंघचालकांच्या सल्ल्यानंतर मुकाटपणे माघार घेतली होती. यावेळीदेखील नागपूरच्या आग्रहामुळेच राजनाथ ऍण्ड कंपनीने मोदींना प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्याचे ठरविले, हे जगजाहीर असल्याने अडवानींच्या असहकाराचा परिणाम झाला नाही. राष्ट्रीय स्तरावर आणि राजकारणात टिकून राहणार तर काही तडजोडी केल्याच पाहिजेत, याची कठोर कल्पना आता पूर्व केंद्रीय गृहमंत्र्यांच्या समर्थकांनाही आली आहे. कुढत बसलो तर तेलही जाईल आणि तूपदेखील, हे सुषमा स्वराज, अनंत कुमार, वेंकय्या यांनी ओळखले आहे अन् गेली सहासात दशके राजकारण जवळून पाहिलेल्या आणि कोळून प्यालेल्या या वयोवृद्ध पण धूर्त नेत्याने जाणले आहे. म्हणून दोन महिन्यांपूर्वी जी व्यक्ती मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि छत्तीसगढचे डॉ. रमनसिंह यांचे गुणगान करीत होती, तिला आता मोंदींच्या कामगिरीबद्दल प्रशंसोद्गार काढावे लागत आहेत. गेल्या तीन महिन्यांमध्ये मोदींनी अडवानींची चारपाच वेळा तरी भेट घेऊन आपल्याविषयीची अढी, अविश्‍वास वा किंतू दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलली. मात्र या ‘जेश्‍चर’चा फारसा परिणाम झालेला नसावा. ज्यावर आता माझा हक्क आहे, तो घास हिरावून घेण्याकरिता टपून बसलेला बोका, अशी भावना बहुधा अडवानींच्या मनात नरेंद्रभाईंविषयी बनलेली असावी. कानांमागून येऊन तिखट होणे म्हणजे काय, याचा प्रत्यय त्यांना आलेला आहे. कोण कालपरवाचा पोरगा. एका राज्याचा मुख्यमंत्री म्हणून दहा वर्षे चमक दाखवतो अन् केवळ त्या भांडवलावर एकदम हनुमान उडी घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगतो म्हणजे काय, ही अडवानींची मनोभूमिका असणार अन् ती समजण्यासारखी आहे.

१९९५ साली आपण स्वतःहून मुंबईत अरबी सागर अन् मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून ‘भाजपचा प्रधानमंत्रिपदाचा उमेदवार अटलजी’ अशी घोषणा केली होती. तो त्याग कुठे आणि आज माझ्या ताटातीलच नव्हे तर हातातील ग्रास लंपास करण्याचा मोदींचा उद्धटपणा कुठे, अशी तुलना अडवानी मनात करीत असतील. वाजपेयींचे अमोघ वक्तृत्व आणि नेमस्त प्रतिमा यांपुढे अडवानींना पड खावी लागली. पण आता वय, अनुभव, कार्यकर्तृत्व तथा त्याग या चतुःसूत्रीत जवळपासही न पोचणार्‍या मोदींकडून हार पत्करावी लागली, हे अडवानी यांचे शल्य असणार. एखादे वेळी डॉ. मुरलीमनोहर जोशींकडून ही कुरघोडी झाली असती तरी ते स्वतःचे समाधान करून घेते. परंतु ६४ वर्षीय मोदी? हा पराभव सहज कसा पचनी पडेल? म्हणून प्रथम जून अन् परवा पुन्हा एकदा त्यांनी अपशकुनाचा प्रयत्न करून पाहिला. त्याचा परिणाम झाला नाही तेव्हा वास्तवता स्वीकारली. मात्र तेवढ्यापुरतेच हे सीमित असेल का?

अशी शंका येते की, त्यामागे काही ‘डील’ आहे. नरेंद्र मोदींचा उदय आपण रोखू शकत नाही; मग निदान स्वतःचा अस्त तरी का ओढवून घ्या? ‘सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजिती पंडितः’ हे सूत्र बहुधा अडवानींनी डोळ्यांपुढे ठेवले असणार. महाधूर्त मोदींनाही पुढील वाटचाल शक्य तेवढी निष्कंटक झालेलीच हवी आहे. कॉंग्रेसी, जेडी (यू), कम्युनिस्ट वगैरे बोलभांडांशी कसे दोन हात करायचे ते नंतर बघूया. आधी स्वजनांतील बुजुर्गांची नाराजी दूर झाली पाहिजे, असा शहाणपणाचा निर्णय त्यांनी केला असावा. त्यानुसार अडवानींच्या मनधरणीकरिता एक ठोस प्रस्ताव त्यांनी सुचवलेला असू शकतो. तो कोणता?

‘‘२०१४ सालच्या पूर्वार्धात ज्या लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए बाजी मारील, हे आज तरी निश्‍चित दिसते. ५४२ पैकी किमान ३०० चे लक्ष्य मी ठेवलेले आहे. अळा रीं ींहश ीींरीी या सूत्रानुसार तरच किमान २७२ चा जादुई आकडा गाठू शकू, हे हेरले आहे. मी अथक प्रयत्न करून हे यश मिळवीनच मिळवीन. सबब आगामी केंद्र सरकार माझ्या नेतृत्वाखाली बनेल. कारण माझ्या नावावरच तर मतदारांना कौल लावला जाणार आहे. २००९ साली तुम्हाला हा बहुमान देऊन झाला. दुर्दैवाने तुमचे नाणे ‘बद्द’ झाले. आता माझा ‘सिक्का’ चालवून बघतो. वातावरण अनुकूल आहे. तुम्ही अपशकुन करून उरलीसुरली प्रतिमा आणखी डागाळून घेऊ नका. प्रथम जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष तथा देश यांसाठीचे तुमचे योगदान निश्‍चितच अतुलनीय आहे. तुमचे सार्वजनिक आणि खाजगी जीवन निष्कलंक आहे. जैन हवाला डायरीत तुम्हाला गोवण्याचा नरसिंह राव सरकारचा प्रयत्न विफल ठरला कारण तुमचे धवल चारित्र्य. परंतु वयाच्या आणि कारकिर्दीच्या सायंकाळी राजकीय स्वार्थभावाचा छोटासाही डाग त्याला लागू नये. कारण तुम्ही आमचे नेतेच नव्हे तर आदर्शही आहात. पक्षासाठी तुम्ही खाल्लेल्या खस्ता आम्हाला माहीत आहेत. उतार वयातदेखील तुम्ही ज्या अथक आणि दीर्घ यात्रा केल्यात, त्या तर तरुणांनासुद्धा लाजवणार्‍या होत. हे सारे तुम्ही पक्षासाठी केलेत, याची विनम्र जाणीव आम्हाला आहे अन् प्रधानमंत्रिपदावर तुमचाच अधिकार पोचतो, हेही मान्य. मी स्वतःविषयी बोलणे योग्य नाही. पण आज माझ्या नावाचा बोलबाला आणि देशभर हवा आहे, हे तुम्हीदेखील कबूल कराल. मग या संधीचा लाभ घ्यायचा नाही का? यूपीए-२ ने गेल्या चार-साडेचार वर्षांत एवढ्या घोडचुका करून ठेवल्या आहेत की असा मोका पुन्हा येणे नाही. मी तुम्हाला आश्‍वस्त करतो की, एनडीएला विजयी करीन म्हणजे करीन.’’

…आणि त्यानंतर त्यांनी अडवानीजींना महत्त्वाचे आश्‍वासन दिले असले पाहिजे. ओळखा पाहू कोणते ते! अहो, राष्ट्रपतिपदाचे. प्रणवबाबूंचा पाच वर्षांचा कार्यकाळ २०१७ साली समाप्त होईल. त्यानंतरच्या निवडणुकीत तुम्ही एनडीए उमेदवार असाल. सरकारप्रमुख बनत नसलात तरी राष्ट्रप्रमुख करू. तुमचा कद, तुमचा स्टॅच्युअर, तुमचा अधिकार, तुमचे स्थान यांचा गौरव करणारे ते पद आहे. म्हणूनच मायूँस व्हायचे कारण नाही. प्रधानमंत्रिपद हे राजकीय स्थान आहे. दैनंदिन जबाबदारी, संसदीय कार्य, देशांतर्गत दौरे हे सगळे नाही म्हटले तरी ‘टॅक्सिंग’ नाही का? या वयातही तुम्ही फिजिकली फिट, मेन्टली ऍलर्ट अन् इंटलेक्युअली ऍक्टिव्ह आहात. परंतु राष्ट्रपतिपद आरामदायी आहे. त्यावर तुमची प्रतिष्ठापना हा शब्द समजा आणि आशीर्वाद द्या.

‘लोहपुरुषा’ने रात्रभर या प्रस्तावावर विचार केला असेल. पत्नी कमला, कन्या प्रतिभा आणि पुत्र जयंत तथा स्नुषा यांच्याशी विचारविनिमयही झाला असेल. आणि त्यानंतर ‘छोट्या सरदारा’चा प्रस्ताव मान्य करण्याचे ठरले असेल. हो, अन्य पर्याय तरी कोणता उरतो? मोदींचा रणगाडा दमदारपणे वाटचाल करीत राहणारच आहे. त्याला विरोध व अपशकुन केल्याने आधीच हंसे झालेले आहे. प्रतिमा डागाळली आणि प्रतिष्ठा डळमळली आहे. ती सावरणार तर एकच मार्ग उरतो. फक्त त्यात अडचण एवढीच की, आणखी चार वर्षे प्रतीक्षा करावी लागेल. वयाचे गणित अनुकूल नाही. परंतु ज्या परमेश्‍वराने एवढे आयुष्य दिले, उत्तम आरोग्य दिले त्याने आणखी नऊ-दहा वर्षे दिली की भरून पावले.