पंचायत निवडणूक प्रचार संपला

0
26

>> १४६४ प्रभागांत ५०३८ उमेदवार; १५१७ मतदान केंद्रांपैकी ४५ संवेदनशील

राज्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या जाहीर निवडणूक प्रचाराची काल सांगता झाली. आता बुधवार दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून, १४६४ प्रभागांतील ५०३८ उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकूण १५१७ मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली असून, मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे. राज्यभरातील ४५ मतदान केंद्रे संवेदनशील, असुरक्षित म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या बारा दिवसांच्या जाहीर प्रचाराची सांगता सोमवारी संध्याकाळी झाली. उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचारावर भर दिला. आमदार आणि मंत्र्यांनी, तसेच अन्य बड्या राजकीय नेत्यांनी देखील ग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन आपापल्या समर्थकांना निवडून आणण्यासाठी प्रचार मोहीम राबवली. राज्यातील मंत्री, आमदार आणि प्रमुख राजकीय नेत्यांसाठी ग्रामपंचायत निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे.
उत्तर गोव्यातील ९७ ग्रामपंचायतींतील ७४२ प्रभागांत निवडणूक होणार असून, २६६७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर गोव्यातून ४१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. दक्षिण गोव्यात ८९ ग्रामपंचायतींमधील ७२२ प्रभागांत निवडणूक होणार असून, २३७१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. दक्षिण गोव्यात २३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

८ लाख मतदार बजावणार हक्क
राज्यातील १८६ ग्रामपंचायत क्षेत्रातील १४६४ प्रभागांत एकूण ७ लाख ९७ हजार ०२० मतदार आहेत, त्यात पुरुष मतदार ३ लाख ८७ हजार ००१ आणि महिला मतदार ४ लाख १० हजार ०१८ एवढे आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी ९ ऑगस्टला संध्याकाळी मतदान केंद्रांचा ताबा घेणार आहेत. या दिवशी दुपारी निवडणूक कर्मचार्‍यांना मतदान साहित्याचे वितरण तालुका पातळीवर केले जाणार आहे.

उत्तरेत २७, तर दक्षिणेत १८ केंद्रे संवेदनशील
राज्यातील ४५ मतदान केंद्रे संवेदनशील व असुरक्षित म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यात उत्तर गोव्यातील २७ आणि दक्षिण गोव्यातील १८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. बार्देशमधील १५, तिसवाडीतील १२, मुरगावातील १२, सासष्टीतील ४ आणि केपेतील २ मतदान केंद्राचा संवेदनशील मतदान केंद्रात समावेश आहे. पंचायत निवडणुकीसाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.