पंचायत निवडणुकांत ओबीसी आरक्षणासाठी अधिसूचना जारी

0
26

>> १९ घटकांचा समावेश; लवकरच प्रभाग आरक्षणाविषयी सुधारित अधिसूचना शक्य

राज्य सरकारच्या पंचायत खात्याने आगामी ग्रामपंचायत निवडणुकांत इतर मागासवर्गीय समाजाला (ओबीसी) आरक्षणासंबंधीची अधिसूचना काल जारी केली. इतर मागासवर्गीयांमध्ये १९ समाज घटकांचा समावेश आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत निवडणुकांत ओबीसी समाजाला प्रभाग आरक्षण देण्यासाठी सुधारित अधिसूचना जारी केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने येत्या ४५ दिवसांत ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिला. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका येत्या १० ऑगस्ट रोजी घेतली जाईल, असे आयोगाने जाहीर केले. लगेचच काही दिवसांत निवडणूक आयोगाने १८५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी महिला, एससी आणि एसटी समाजासाठी आरक्षण जाहीर केले; मात्र त्यावेळी ओबीसी समाजाला आरक्षण जाहीर करण्यात आले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षणासाठी अहवाल उपलब्ध नसल्याने ओबीसी समाजासाठी आरक्षण जाहीर करण्यात आलेले नव्हते.

राज्यातील ओबीसी समाजाला पंचायत निवडणुकांत आरक्षण जाहीर करण्यात न आल्याने नाराजी व्यक्त होत होती. भंडारी समाज संस्था व इतरांनी ओबीसीसाठी आरक्षण देण्याची मागणी केली होती. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ओबीसी आरक्षणासंबंधी याचिका दाखल करण्यात आली होती; मात्र न्यायालयाने सदर याचिका ङ्गेटाळून लावली होती.
राज्य मागासवर्गीय आयोगाने ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षण अहवाल तयार करून सरकारला सादर केला. त्यानंतर राज्य सरकारने सदर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला.

आता राज्य सरकारच्या पंचायत खात्याने ग्रामपंचायत निवडणुकांत ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली अधिसूचना जारी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदान व मतमोजणीची तारीख यापूर्वीच जाहीर केलेली आहे; मात्र निवडणूक कार्यक्रम जाहीर केलेला नाही. विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर निवडणूक कार्यक्रम व निवडणूक आचारसंहिता लागू केली जाण्याची शक्यता आहे.

१९ घटकांना आरक्षणाचा लाभ
पंचायत निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा लाभ १९ घटक समाजाला मिळणार आहे. त्यात कुंभार (ख्रिश्‍चन कुंभारांचा समावेश), तेली (ख्रिश्‍चन तेलींचा समावेश), शिंपी, ख्रिश्‍चन महार, कलयकार-लोहार, ख्रिश्‍चन न्हावी, सतरकर, भंडारी नाईक, धोबी-रजक-मडवळ (ख्रिश्‍चन धोबींचा समावेश), न्हावी, खारवी (ख्रिश्‍चन खारवींचा समावेश), नाथजोगजी, गोसावी, धनगर, विश्‍वकर्मा, पागी-गाबीत, ठक्कर, कोमरपंत, रेंदेर या समाजाचा समावेश आहे.