राज्य निवडणूक आयोगाने ठरवले अपात्र
राज्य निवडणूक आयोगाने तिसवाडी तालुक्यातील सेंट लॉरेन्स आगशी ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच आणि विद्यमान पंच सदस्य एमी लिओनोरा फर्नांडिस यांना पंचायत निधी गैरव्यवहार प्रकरणात अपात्र काल ठरवले आहे.
या पंचायतीचे सरपंच आणि पंच सदस्यांनी पंचायत क्षेत्रातील गटार साफसफाई, झाडे झुडपे तोडण्याचे काम स्वतः करून पंचायतीचे पैसे स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा केले होते. हा प्रकार लक्षात आल्याने पंचायतीचे माजी पंच सदस्य हिलेरी परेरा यांनी ऑक्टोबर 2024 मध्ये माजी सरपंच आणि विद्यमान पंच सदस्य एमी फर्नांडिस आणि इतर दहा जणांंविरोधात पंचायत निधीचा गैरव्यवहार प्रकरणात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. एमी फर्नांडिस व इतरांवर पंचायतीच्या आर्थिक अनियमिततेचा आरोप केला होता.
राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रकरण आपल्या कक्षेत येत नसल्याचे कारण देऊन प्रकरणावर निर्णय घेण्यात नकार दिला होता. त्यानंतर, तक्रारदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात यासंबंधी याचिका दाखल केली होती. गोवा खंडपीठात पंचायत निधीच्या गैरव्यवहार प्रकरणात सुनावणी घेण्यात आली. गोवा खंडपीठाने गोवा राज्य निवडणूक आयोगाला या प्रकरणाची सुनावणी घेऊन निवाडा देण्याचा निर्देश दिला. त्यानंतर आयोगाचे आयुक्त दौलत हवालदार यांनी या प्रकरणात सुनावणी घेऊन निवाडा जाहीर केला आहे. या पंचायत सदस्याच्या निधीच्या गैरव्यवहार प्रकरणामध्ये पंचायत सचिवांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्याच्याविरोधात निवाड्यात शेरा मारण्यात आला आहे. आयोगासमोर तक्रारदाराच्यावतीने ॲड. हृदयनाथ शिरोडकर यांनी युक्तिवाद केला.

