Home बातम्या पंचायत क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदार

पंचायत क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदार

0

राज्यभरातील स्थितीमुळे पंचायत खात्याचा निर्णय

गोवाभरातील पंचायत क्षेत्रातील प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय पंचायत संचालनालयाने घेतला असून त्यासाठी ‘एनव्हायरोटॅक एनर्जी ऍण्ड सायन्स’ या एजन्सीशी बोलणी चालू असल्याचे पंचायत संचालक नारायण सावंत यानी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

प्लॅस्टिकसह एकूण कचर्‍याची समस्या ही गंभीर बनल्याच्या पार्श्‍वभूमीवर संचालनालयाने वरील निर्णय घेतला असल्याचे त्यानी सांगितले.

आपल्या क्षेत्रातील कचरा समस्या सोडवता यावी यासाठी कचरा प्रकल्प उभारण्यास राज्यातील २२ ग्रामपंचायतींनी पंचायत खात्याकडे ना हरकत दाखल्याची मागणी केली होती. त्या सर्वांना यापूर्वीच खात्याने ना हरकत दाखले दिले असल्याचे सावंत यानी सांगितले. पैकी १२ पंचायतींनी तर या कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी कलम ६ लागू करून जमीन संपादन प्रक्रिया सुरू केल्याचे सावंत यानी स्पष्ट केले.

ज्या कंत्राटदाराला राज्यभरातील पंचायतींतील प्लॅस्टिक कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात येईल तो कंत्राटदार पंचायतींनी गोळा करून ठेवलेला प्लॅस्टिक कचरा उचलून नेणार असल्याचे सावंत यानी सांगितले.