राज्यातील ग्रामपंचायतीच्या 9 सेवा ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध केल्या जाणार आहे. ग्रामपंचायतीमध्ये येत्या 1 ऑगस्टपासून नियमित एआय आधारित हजेरी कार्यान्वित केली जाणार आहे, अशी घोषणा पंचायत, उद्योग तथा वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत आपल्या संबंधित खात्यांच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल केली. गोवा ऑनलाईन पोर्टलवर निवास, वर्तणूक, उत्पन्न दाखला, वीज ना हरकत दाखला, पाणी कनेक्शन, घर दुरुस्ती, व्यापार परवाना आदी उपलब्ध केले जाणार आहेत. ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना पंचायात कार्यालयात जाण्याचा गरज भासणार नाही. नागरिकांना घरातूनच विविध सेवांचा लाभ घेतला जाऊ शकतो. या सेवा येत्या 25 ऑगस्टपासून सुरू केल्या जाणार आहेत. सर्व ग्रामपंचायती डिजिटल केल्या जाणार आहेत. प्रथम टप्प्यात पाच पंचायती डिजिटल करण्यात आल्या आहेत, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

