26.1 C
Panjim
Friday, June 25, 2021

पंचसंवेदनांचे नेत्र लाभलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णी

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

काव्यात्मकतेने ओथंबलेले, तरल संवेदनायुक्त आणि छोट्या-छोट्या वाक्यांतून समर्थ शैलीद्वारे अनोखे शब्दशिल्प साकार करणे हा त्यांचा स्थायी भाव. मिताक्षरांमधून अर्थसघन आशय व्यक्त करणारे, शब्दांतून चित्रमय सृष्टी दृग्गोचर करणारे कवितेसारखेच हे लेखन.

 

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा जवळून परिचय कधी झाला नाही. पण त्यांच्या ललितनिबंधांतील अप्रतिम शैलीमुळे ते जवळचे वाटायला लागले. माझ्या आवडत्या लेखकांमधील ते एक आहेत. अधूनमधून अलीकडच्या काळात त्यांना लिहिलेल्या पत्रांतून आणि दूरध्वनीवरून झालेल्या संवादामुळे ही जवळीक वाढली. अभिरुचिसंपन्न लेखक म्हणून ‘सत्यकथा’ मासिकामुळे १९६५ पासून त्यांची ओळख झालीच होती. महाविद्यालयातील विद्यार्थिदशेत त्यांचे या मासिकातून प्रसिद्ध होणारे ललित निबंध वाचणे हा एक आनंदानुभव होता. काव्यात्मकतेने ओथंबलेले, तरल संवेदनायुक्त आणि छोट्या-छोट्या वाक्यांतून समर्थ शैलीद्वारे अनोखे शब्दशिल्प साकार करणे हा त्यांचा स्थायी भाव. मिताक्षरांमधून अर्थसघन आशय व्यक्त करणारे, शब्दांतून चित्रमय सृष्टी दृग्गोचर करणारे कवितेसारखेच हे लेखन. कधीकधी या ललितबंधाला कविता का म्हणू नये असा प्रश्‍न मनात निर्माण व्हायचा. ‘सत्यकथा’ मासिकाच्या जुन्या संचिका हाताळताना श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या कवितादेखील झळकल्या होत्या हे प्रत्ययास आले. कवितेचा हात त्यांनी जरी सोडला तरी कवित्वशक्तीचा पाझर त्यांच्या अंतर्यामी कायमचा राहिला. ललित निबंध या एकाच वाङ्‌मयप्रकाराकडे त्यांनी लक्ष एकाग्र केले. मोजके लिहून गुणवत्तेचा आदर्श त्यांनी निर्माण केला. ‘डोह’, ‘सोन्याचा पिंपळ’, ‘पाण्याचे पंख’ आणि ‘कोरडी भिक्षा’ हे त्यांचे चार ललितनिबंधांचे संग्रह. भावसंपन्नतेचा प्रत्यय देणारे. निसर्गाच्या संपन्न रूपकळेला नित्यनूतन शब्दकळेतून साकार करणारी त्यांची प्रतिभा. सहसा कुणाला न लाभणारी. त्यांच्या लेखनाला चोखंदळ रसिकवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मराठीतील डॉ. सरोजिनी वैद्य, प्रा. शांता शेळके, डॉ. सुधा जोशी आणि प्राचार्य म. द. हातकणंंंंंगलेकर यांच्यासारख्या मर्मज्ञ आणि रसज्ञ समीक्षकांनी तदात्म होऊन त्यांच्या ललितनिबंधांवरची समीक्षा लिहिली. ‘मनातल्या उन्हात’ हा त्यांचा पहिला ललित निबंध. ‘डोह’मध्ये समाविष्ट झालेला ‘आम्ही वानरांच्या फौजा’ हा ललित निबंध ‘सत्यकथा’ मासिकात ऑक्टोबर १९६१ मध्ये प्रसिद्ध झाला होता. मराठी साहित्यात नवी संवेदनशीलता येत असल्याच्या पाऊलखुणा या काळाच्या आसपास दिसत होत्या. पूर्वीच्या संकेतप्रणाली मोडून नवे काहीतरी घडविण्याची जिद्द लेखक-कवींमध्ये आढळून येत होती. अशा वेळी त्यांनी हे लेखन केले. १९६० ते १९६२ च्या दरम्यान श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी ‘रूप’ या कवितेला वाहिलेल्या लघुनियतकालिकाचे संपादन केले. त्यात इंदिरा संत, द. भि. कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, शांताराम रामचंद्र शिंदे, प्रल्हाद वडेर, व. ह. पिटके, वासंती मुझुमदार आणि सिंधू अराणके इत्यादींनी लेखन केले. साहित्याच्या नव्या मळवाटेवरचे हे लेखन होते.

‘डोह’ हे श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचे पहिले पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. अर्धशतकाहून अधिक काळ लोटला या घटनेला, पण अजूनही हे लेखन अवीट गोडीचे का वाटते? लेखकाने आपल्या अनुभूतीशी प्रामाणिक राहावे. निसर्गवृत्तींशी निरागस मनाने तदात्म व्हावे. वास्तवात आपली मांड पक्की ठेवून स्वप्नांच्या पंखांनी उडावे. शब्दांना तरलतेचा गंध यावा. त्यातून मग बालकवी- ना. धों. महानोर- नलेश पाटील यांच्यासारखे कवी निर्माण होतात. दुर्गाबाई भागवत- श्रीनिवास विनायक कुलकर्णी- मारुती चित्तमपल्ली- वासंती मुझुमदार- यशवंत पाठक यांच्यासारखे ललितनिबंधकार आपले भावविश्‍व फुलवितात. साहित्याचे क्षितिज संपन्न करतात.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्या ‘डोह’मधील यक्षनगरीत काय काय आढळते? औदुंबरच्या आसपासचा परिसर त्यांनी रूप-रस-गंध-स्पर्श-नाद या संवेदनांनिशी चैतन्यमय केला आहे. यात लेखकाच्या बालवयातील आठवणी आहेत. अनेक संपन्न साठवणी आहेत. मी आणि आम्ही यांमधील अंतर येथे फिटून गेले आहे. एव्हाना यंत्रयुगाचा स्पर्श न झालेला, पूर्वसंचिताने भारलेला आणि केवळ कोवळा राहिलेला भूप्रदेश- प्राणिसृष्टी व पक्षिसृष्टी यांमुळे गजबजलेला- चैतन्यशील झाला आहे. हे लिहिणे नसून जगणे आहे. इतके स्वाभाविकपणे लिहिता येते असा आत्मविश्‍वास तत्कालीन पिढीत कुलकर्णी यांनी निर्माण केला. काव्यात्म अनुभूतीने विनटलेले हे शब्दशिल्प अनुभवताना आपल्या अंतःश्रुती जागृत ठेवाव्या लागतात. ‘आम्ही वानरांच्या फौजा’, ‘मृगजळातील यक्षघराला’, ‘जुन्या जन्मीची माणसे’, ‘रात्र दिवाभीताची’, ‘मनातल्या उन्हात’, ‘डोहापलीकडे’, ‘वारा वाहे रुणझुणा’, ‘शब्दांच्या संध्याकाळी’, ‘पाणी’, ‘सुसरींचे दिवस’ आणि ‘हा चौघडा झणाणे’ हे सारेच ललितनिबंध सरसरमणीय आहेत. लेखकाच्या भावविश्‍वात वनस्पती, पशुपक्षी, नदीप्रवाह, त्याचा डोह, त्याच्या साहचर्याने येणार्‍या सुसरी, वानरे, वड, पिंपळ इत्यादी वृक्षविशेष, घरातील आप्त आणि परिसरातील माणसे या सर्वांचे तपशील वातावरणाला जिवंतपणा आणतात. योगायोगाने ‘डोह’ आम्हाला बी.ए.च्या परीक्षेसाठी नेमलेला होता. त्यांच्याच पिढीचे आणि त्यांचेच सुहृद प्रा. प्रल्हाद वडेर यांनी तो आम्हाला तन्मयतेने शिकवला.
‘डोह’नंतर श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा ‘सोन्याचा पिंपळ’ हा ललितनिबंधसंग्रह प्रसिद्ध झाला. या संग्रहातील अनुभूतिदर्शन आगळे-वेगळे आहे. अतिंद्रिय अनुभवांचे विश्‍व येथे उलगडले आहे. ‘डोह’मध्ये बालमन प्रकट झाले, तर ‘सोन्याचा पिंपळ’मध्ये प्रौढमन प्रकट झाले आहे. ‘घंटीवाला’ या पहिल्याच लेखात आपल्या छोट्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास लेखकाने चित्रित केला आहे. ‘सोन्याचा पिंपळ’मधील अनुभूतिदर्शन वेगळ्या भावप्रदेशात नेणारे आहे. ‘तळ्याकाठी संध्याकाळी’ या ललितनिबंधात पुढील शब्दांत निसर्गवर्णन येते ः
‘‘पाण्यावरचा काळिमा गडद झाला होता. झाडेही गडद होऊन दिसेनाशी.
विवेकला म्हटले, ‘झोप आली काय?’
‘हट्. मी इथं बसून पाणी बघणार आहे.’
तो तन्मय झाला होता.

आम्ही उठलो. तळ्याच्या पायर्‍यांना लगटून मंदिर होते. शंकराचे. घंटा वाजत होत्या. मंदिराच्या तळ्याकडल्या भिंतीच्या जाळीतून, चांदीच्या मोठ्या निरांजनातल्या हलत्या ज्योतींचा प्रकाश तळ्यावर हेलकावत होता.’’
दृक-नाद संवेदनायुक्त चित्र साकार झाल्याची ही अनुभूती आहे. ‘पैल’ या ललितनिबंधात काळोखाचे गूढरम्य चित्र रेखाटले गेले आहे ः
‘‘रंगीत फिल्म सरकावी तशी डोळे मिटल्यावरही दृश्यं सरकत असतात आणि दृश्यं नसतात तेव्हा नुसता काळाभोर काळोख कधीच डोळ्यांपुढं दिसत नाही. मी केवळ काळाभोर काळोख कधी बघितलाच नाही. काळ्याभोर काळोखातही, समुद्रात आतून असावेत तसे प्रवाह चाललेत असं दिसतं… आणि काहीतरी ऐकू आल्यासारखं वाटतं. ते प्रवाह कुठंतरी पलीकडे पोचताहेत, असं भासतं…
दादा म्हणाले,
खरं आहे… अंधार हा अंतःस्थाचाच भाग आहे… आणि अंतःशक्तीचे प्रवाह सर्वव्यापी असतातच.’’
निसर्गशक्तीकडे सर्वांग परिपूर्णतेने पाहण्याची वेगळी दृष्टी या लेखकाकडे असल्याचे जाणवते. ‘उदासीनदास’, ‘धमानि भूमौ’ आणि ‘काळोख चोहूंकडे’ हे त्यांचे ललितनिबंध अतिशय वाचनीय आहेत. ‘पाण्याचे पंख’ या ललितनिबंधसंग्रहात लेखकाने आपले घर, घराभोवतालचा परिसर आणि त्यात वावरणार्‍या लहान मुलांचे भावविश्‍व तन्मयतेने रंगविले आहे. ‘आलोक’, ‘पदम’, ‘मनू’ आणि ‘मिकी’ या ललितनिबंधांत या लेखकाची बालविश्‍वाशी झालेली एकरूपता अनुभवावी. ‘कोरडी भिक्षा’ हा त्यांचा परिणतावस्थेतील ललितनिबंधसंग्रह. लोकमान्यतेबरोबर त्याला राजमान्यता मिळाली. महत्त्वाचे पुरस्कार लाभले.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांना आपली लेखनशैली रुजवावी लागत नाही. त्यांचे मन कलासंपन्न आणि अभिरुचिसंपन्न आहे. त्यांचे आजोबा दत्तो विष्णू कुलकर्णी हे उत्तम चित्रकार आणि लेखक होते. त्यांचे वडील विनायक दत्तो कुलकर्णी हेदेखील उत्कृष्ट चित्रकार होते. वडिलोपार्जित वारसा श्रीनिवास कुलकर्णी यांनी जोपासला. वर्धिष्णू स्वरूपात ठेवला. थोरामोठ्यांचा सहवास त्यांना लाभला. त्याला तर गणतीच नाही. अनेक वर्षे त्यांनी ‘मौज’ वार्षिकाचे संपादन निगुतीने आणि अत्यंत नेटकेपणाने केले. हे अंक अधूनमधून न्याहाळणे हा माझा आवडता छंद आहे. ‘मौज’च्या लेखक-कवींच्या मांदियाळीत ते रमले. साहित्यविश्‍व हेच त्यांच्या ‘स्वानंदाचे जिव्हार’ बनले. त्यांचे हस्ताक्षर मोत्यासारखे. चित्रकला त्यांनी अगवत केली आहे. या अभिरुचिसंपन्न सहित्यिकाकडे २००३ मध्ये कर्‍हाडला झालेल्या अ. भा. साहित्यसंमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाचा बहुमान आला तो उगाच नव्हे. त्यांचे त्या अधिवेशनात झालेले भाषण त्यांच्या सर्व गुणांच्या समुच्चयाचा प्रत्यय आणून देणारे.

परिणतावस्थेत त्यांनी काही समृद्ध व्यक्तिमत्त्वांचे दर्शन घडविणारे उत्तम लेख लिहिले. ते त्यांच्या स्वभावातील पापुद्य्रांसह. श्रेष्ठ कवयित्री इंदिरा संत, कविश्रेष्ठ विंदा करंदीकर यांचे ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतील लेख यासंदर्भात आठवावेत. श्रेष्ठ लोकनेते आणि अभिरुचिसंपन्न यशवंतराव चव्हाण यांंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘मौज’ वार्षिकात त्यांनी लिहिलेला लेख आणि त्यानंतर समृद्ध व्यक्तिमत्त्वाच्या कवयित्री शांताबाई शेळके यांच्यावरील तन्मयतेने लिहिलेला प्रदीर्घ लेख वाचावा म्हणजे याची साक्ष पटेल.
मला गुरुस्थानी असलेल्या श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांच्याशी अनुबंध जुळून आले, हा मी माझ्या आयुष्यातील भाग्ययोग मानतो. त्यांच्या आशीर्वादाचा हात मला सतत लाभत आलेला आहे.

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सुस्तावाल तर पस्तावाल!

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व...

आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा >> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण कोरोनाच्या दुसर्‍या...

लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच राज्यात प्रवेश द्यावा : लोबो

गोव्यात एकदा संचारबंदी हटवल्यानंतर राज्यात पर्यटन उद्योग सुरू होणार आहे. अशावेळी कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना तसेच कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्यांना राज्यात...

सीबीएसई, आयसीएसईच्या १०वी/१२ वीच्या परीक्षा रद्दच

>> सर्वोच्च न्यायालयाचे शिक्कामोर्तब कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने सीबीएसई आणि आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षादेखील रद्द करण्याचा निर्णय...

राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात...

ALSO IN THIS SECTION

हिमालयाच्या सर्वोच्च शिखराचे मापन कुणी केले?

दत्ता भि. नाईक ‘हिमालयन माऊंटेनियरिंग इन्स्टिट्यूट’ ही साधीसुधी संस्था नाही. तिच्याच अध्यक्षांनी हा विषय काढल्यामुळे तो आता चर्चेचा...

ख्याल गायकीचे अनभिषिक्त सम्राट पं. राजन मिश्रा

गो. रा. ढवळीकर बुलंद आवाजाने व भावपूर्ण गायकीने जगभर मैफिली गाजवणारे पं. राजन मिश्रा एवढ्या लवकर जातील असे वाटले...

कर्जदार मृत्यू पावल्यास वसुलीचे काय?

शशांक मो. गुळगुळे सध्या कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. बर्‍याच चालत्या-बोलत्या व्यक्ती अचानक जाण्याचे अनुभव येत आहेत. अशा...

सख्य

गिरिजा मुरगोडी फ्रेण्डशीप-डे हा सर्व सर्व स्तरांवरचा मैत्री दिवस, तर हा खास सख्य उजागर करणारा मैत्र दिन. संकल्पना...

परीक्षांचं करायचं काय?

दिलीप वसंत बेतकेकर खरं तर शिकणं म्हणजे काय तर जाणून घेणं; व जाणून घेण्याची क्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत...