– प्रकाश आचरेकर, वास्को
फावल्या वेळेला बहुतेक लोक फार महत्त्व देतात. त्या वेळेचा माणसे सदुपयोग करतात. ते आपल्या पुढील जीवनाचा शांतपणे बसून खोल विचार करून आराखडा काढतात. या रिकाम्या वेळेचा उपयोग चित्रकारांनी चित्रे काढण्यास, लेखकांनी पुस्तके लिहिण्यास, संगीतकारांनी आपली कला वाढविण्यास, कवींनी कविता लिहिण्यास, शास्त्रज्ञांनी नवीन शोध लावण्यास तर उद्योगपतींनी उद्योगाचा आराखडा तयार करण्यास केला आहे.
काही धडपडणारी माणसे सतत कामात रममाण राहतात. त्यांना आपला कसा वेळ गेला याचे भानच राहत नाही. त्यांना प्रत्येक मिनिट हे मोलाचे वाटते. म्हणून या लोकांना सकाळी उठल्यापासून रात्री झोपायला जाईपर्यंत फुरसतीचा वेळ मिळत नाही. त्यांचे जीवन एका यंत्रासारखे बनलेले असते. या उलट काही माणसांजवळ नोकर – चाकर असतात. त्यामुळे स्वतःसाठीची साफसफाई व खाण्याच्या हालचालीत वेळ जातो. मग राहिलेला सर्व वेळ रिकामटेकडेपणातच जातो.
सर्वसामान्य लोकांचा समज आहे की, काम केल्याने ऊर्जा वाया जाते, अथवा शक्ती कमी होते. म्हणजेच आता अशक्त होणार. म्हणून त्यांना आपल्या अंगातली ऊर्जा वाया गेलेली आवडत नाही. हे लोक बसून राहणेच पसंत करतात. चालायलासुद्धा पाहत नाहीत. इकडून तिकडे जाताना गाडीचा वापर करतात. फार काय तर ऑफिसमध्ये आरामखुर्चीचा वापर करतात. या लोकांना आरामात अथवा त्या सुखात राहणेच आवडते. या उलट मुलांच्या जीवनाकडे न्याहाळून पाहा. त्यांची परीक्षा झाली की, ती घरात सापडणे शक्य नाही. संपूर्ण दिवस ती खेळण्यातच राहतात. अशावेळी त्यांना खाण्यापिण्याचे भान राहत नाही. त्यांना जेवणात मिळालेले जीवनसत्त्व वाढीसाठी व राहिलेल्या अन्नाची उर्जा खेळण्याच्या हालचालीत वापरली जाते. एवढे करून शेवटी त्यांचे आरोग्य निरोगी राहून त्यांच्या शरीरात कुठल्याही जीवनसत्त्वाची कमतरता राहत नाही.
वास्तविक, माणसाच्या जेवणातील ऊर्जा खर्च न होता शरीरात कोंडून राहिली तर माणसाच्या शरीरावर दुष्परिणाम होतो. तिला योग्य काम न मिळता रिकामपणा वाढल्यास तिच्यावर दुष्परिणाम होऊन न्यूरोसीस अथवा वेडसरपणाचा माणूस शिकार होतो. तेव्हा रिकामपणा घालवण्यासाठी विविध तर्हेच्या मानसिक ताण घालवणार्या वर्गात माणसे जातात.
आता कामावरील माणसे, ही शनिवारच्या रात्रीचा वेळ हा कसा घालवायचा याचा विचार करून रात्री पार्टी करणे, डान्स करणे, खाणेपिणे अशा तर्हेच्या तामस मार्गाने ‘मजा’ करून वेळ घालवतात. तेव्हा या कृतीने थोडा मनाला विसावा मिळत असेल, परंतु दुसर्या दिवशी जागरणाने व धुंदीने डोळे व डोके जड होऊन जाते.
ही रिकामा वेळ गुजारणे कित्येकांना थोडे कठीणच होते. मग काही लोक तो कंठण्यासाठी झोपून वा अंथरुणावर तळमळून काढतात. नंतर टी.व्ही.वरील मनोरंजन कार्यक्रम बघतात, तर काही मैदानावरील खेळ बघायला जातात आणि काही रात्रौ नाटके, सिनेमा वगैरे बघून मनोरंजन करतात. हा रिकामा वेळ निभावण्यासाठी रस्त्याच्या चौकात उभे राहून राजकारणातल्या गोष्टी व नंतर चहा पिण्यासाठी हॉटेलात अथवा बार मध्ये वेळ घालवतात व मनाचे रंजन करतात. आणखी सांगायचे म्हणजे या रिकामटेकड्या वेळातून काही जणांना चांगले करण्याचा मार्ग मिळत नाही, म्हणून वाममार्गी लागतात. याउलट काहींना या आधुनिक युगातील कामधंद्यापुढे खाण्यापिण्यासाठीही वेळ मिळत नाही.
वास्तविक हे सगळे व्याप शारीरिकदृष्ट्या वाईट व बौद्धिकदृष्ट्या निष्क्रियतेचे असेच समजून येतात. त्यात ऊर्जेच्याविषयी बोलायचे तर त्यात काहीही फायदा न होता ती वाढवण्याचाच मार्ग आहे. माणसांच्या अंगात अतिरिक्त ऊर्जा वाढून चरबी, कोलेस्ट्रेरॉल, रक्तातील साखर या रूपात कोंडून राहते व माणूस अनेक रोगांना बळी पडतो. त्या आधुनिक रोगांतील मुख्य रोग उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, मुत्रपिंड दोष व कर्करोग होय.
या उर्जेच्या उद्भवलेल्या दुष्परिणामासाठी आताचे डॉक्टर रुग्णांना जेवण – खाण्याचे पथ्य व निर्बंध घालवतात आणि चालण्या फिरण्याचा व इतर हलक्या व्यायामाचा सल्ला देतात.
माणसांची मनातील गोष्ट प्राप्त करण्याची तीव्र वासना, यातून प्राप्त झालेल्या गोष्टीतून काही अशी आधुनिक सुख प्राप्त होते. हे बरोबर. परंतु त्याचबरोबर अहंकार, लालसा, द्वेष, क्रोध व काम आदी विकारांना माणूस बळी पडतो. या विकारामुळे माणूस वेडसर वागतो. याला मानसिक विकार अथवा न्यूरोसिस भागात गणले जाते. या आजाराने माणूस सरळसरळ दुसर्यांना दुखापत पोहोचवत नसला तरी अतिशयोक्तीने मनाचा ताबा जाऊन अतिरेकी होण्याचा संभव असतो.
शेवटी माणसाला आपण पंच विकाराने बळी पडलो आहोत, हे कळल्यावर त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो मंदिर, मशीद, चर्च आदी धार्मिक स्थळी धाव घेतो. तिथे तो शांती प्राप्त करून घेण्याची कामना करतो. परंतु त्याचे बेलगाम खाणे, पिणे व आधुनिक युगातील चढाओढ, आधुनिक जीवनशैली, आराम व सुख खाणे या कृतीमुळे त्यास्थळी कसलाच फायदा होत नाही.
न्युरोसीस अथवा पंचविकारांवर ताबा मिळविण्याचा चांगला उपाय म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यवसायाचे व मग घरचे काम मन रममाण करून घालवायची आहे. त्यात घरची साफसफाई, स्वयंपाकात, बाजारातील वस्तू आणणे, वाहनाची देखभाल करणे, नंतर पुस्तक वाचनात रस घेणे, आपल्या आवडत्या कलेत रमून जाणे व झाडे जनावरांची सेवा करण्यात रममाण होणे.
प्राचीन काळ नजरेसमोर आणल्यास त्याकाळी माणूस दिवस उगवल्यापासून दिवस मावळेपर्यंत शारीरिक श्रम करत राहायचा. म्हणून त्याला कसलीच काळजी, चिंता नव्हती. पंचविकारांचा त्याच्या अंगाला वासही नव्हता. त्याचप्रमाणे माणसाने आधुनिक युगातील जीवनशैलीला लगाम लावून श्रम करायला शिकले पाहिजे. तेव्हा व्यायाम करणे, योग करणे, ध्यान करणे व निसर्गाची सेवा करणे होय.

