Home बातम्या ‘न्यूजवीक’ची मुद्रित आवृत्ती बंद होणार

‘न्यूजवीक’ची मुद्रित आवृत्ती बंद होणार

0

जानेवारीपासून केवळ डिजिटल स्वरूपात

अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे प्रख्यात आंतरराष्ट्रीय नियतकालिक ‘न्यूजवीक’ आता अखेरचा दंडवत घालण्याच्या तयारीत असून लवकरच या नियतकालिकाची मुद्रित आवृत्ती बंद केली जाणार आहे. संपूर्णपणे डिजिटल स्वरूपातच ते सन २०१३ पासून सुरू राहील.

३१ डिसेंबरचा अंक हा या नियतकालिकाचा शेवटचा मुद्रित अंक असेल. कर्मचार्‍यांचीही कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. अधिकाधिक ग्राहक मोबाईल आणि टॅब्लेट तसेच इंटरनेटचा वापर करीत असल्याने मुद्रित आवृत्तीपेक्षा डिजिटल आवृत्त्यांवर नियतकालिके भर देऊ लागली असून न्यूजवीकप्रमाणेच स्मार्टमनीसारखी अन्य नियतकालिकेही मुद्रित आवृत्त्या बंद करण्याच्या तयारीत आहेत.

न्यूजवीकची मालकी असलेल्या कंपनीचे प्रमुख बॅरी डिलर यांनी गेल्या जुलैमध्ये ‘न्यूजवीक’ नियतकालिकाच्या मुद्रित आवृत्तीच्या भवितव्याचा विचार केला जाणार असल्याचे सूतोवाच केले होते. हा ब्रँड जगभरात प्रख्यात आहे, परंतु मुद्रित स्वरूपात साप्ताहिक काढणे हे सोपे राहिलेले नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले होते.

मुद्रित आवृत्ती बंद करण्याच्या या निर्णयाची घोषणा संपादक टीना ब्राऊन यांनी केली. ऑनलाइन आवृत्तीला यापुढे ‘न्यूजवीक ग्लोबल’ असे संबोधले जाईल आणि जगभरासाठी एकच आवृत्ती असेल, जिच्यासाठी वर्गणी भरावी लागेल. टॅब्लेट आणि मोबाईल फोनवरही ही आवृत्ती उपलब्ध करून दिली जाणार आहे.