खाणी सुरू करण्यासाठी सर्व घटकांकडून दबाव
डिचोली तालुक्यातील अनेक पंचायतींचे सरपंच, पंच, जि. पं. सदस्य, नागरिक यांच्या बरोबरच खाण व्यवसायाशी संबंधित सर्वच घटकांनी खाण बंदीच्या आदेशाची धास्ती घेतलेली असून राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जनतेची बाजू मांडून कायदेशीर खाणी तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
न्हावेलीचे सरपंच गोपीनाथ गावस यांनी सांगितले की संपूर्ण न्हावेली पंचायत क्षेत्रातील ९० टक्के जनता खाण व्यवसायाशी निगडीत आहे. ट्रक, गॅरेज, स्पेअरपार्ट व इतर अनेक व्यवसाय खाणीशी निगडीत आहेत. खाणी बंद झाल्याने पूर्ण गावावरच संकट ओढवले आहे. राज्य सरकारने त्वरित याबाबत तोडगा काढावा व दिलासा द्यावा असे ते म्हणाले.
आमोणा सरपंच उज्वला राजेंद्र सावंत म्हणाल्या की, खाणीच्या बाबत केंद्र व राज्य सरकारचे झगडे आता सामान्य जनतेवर शेकलेले असून खाणी बंदीचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही तरी करा पण खाणी सुरू करा. नाहीतर मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होण्याची भीती व्यक्त केली.
संदेश नाईक यांनी सांगितले की, ट्रकवाले व इतर घटकांवर खाण बंदीमुळे बाका प्रसंग आलेला आहे. यातून सुटका होण्यासाठी कायदेशीर खाणी सुरू करणे हाच उपाय आहे. शांतीलाल आमोणकर यांनी खाण बंद झाल्याने या भागातील जनतेचा कणाचा मोडलेला असून सर्व प्रकारची चौकशी करा, परंतु खाणी सुरू ठेवून या सर्व गोष्टी करून कराव्यात. जनतेला उपाशी मारू नका अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. सुर्लाचे सरपंच मंगलदास उसगावकर यांनी सुर्ल पंचायत क्षेत्रातील ८० टक्के जनता खाण व्यवसायावर अवलंबून आहे. खाणी बंद झाल्याने या व्यवसायिकांची चिंता वाढलेली आहे. रोजगार तसेच बँकांचे हप्ते कसे काय फेडायचे या विंवचनेने झोप उडालेली आहे. सरकारने त्वरित खाणी सुरू केल्या तर जनतेला दिलासा मिळणार आहे, असे मत व्यक्त केले. वेळगेचे सरपंच गोपीनाथ कामत यांनी वेळगे क्षेत्रात खाणीचा मोठा व्यवसाय असून तो ठप्प झाल्याने आर्थिक संकट कोसळलेले आहे. यातून डोके वर काढायचे कसे ही विवंचना सतावत असून गोवा व केंद्र सरकारने त्वरित सुवर्णमध्य साधून खाणी सुरू करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी केली.