नौदल कुंपणाकडील गोठे पाडले

0
46

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वरुणापुरी येथे नौदलाच्या कुंपणाजवळ असलेले पाच गोठे गोवा पोलीस आणि नौदल अधिकार्‍यांच्या उपस्थितीत पाडण्यात आले. वरुणापुरी येथे नौदलाच्या कुंपणाजवळ उत्तर भारतीयांतर्फे उभारण्यात आलेले गाईचे गोठे बेकायदेशीर तसेच सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याने त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी नौदलाने जिल्हाधिकारी व मुरगाव पालिकेकडे तक्रार केली होती. तसेच सदर गोठे नाफ्ता वाहिनी ज्या भागातून जात आहे तिथेच उभारण्यात आल्याने ते काढून टाकण्यासाठी झुआरी ऑयल इंडस्ट्रीने तक्रार केली होती.

सदर तक्रारीची दखल घेऊन मुरगाव पालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व नौदलातर्फे संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती. प्राधिकरणाचे अधिकारी सी.पी.ओ. फुर्तादो सकाळी १० वाजण्याच्या सुमारास वरुणापुरी गेट जवळ दाखल झाले. पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्याच्या तयारीत असताना संबंधितांनी गोठ्यातील गुरे बाहेर काढण्यासाठी वेळ मागून घेतल्याने दु. २.३० वाजता कारवाई करून पाच गोठे पाडण्यात आले. तसेच तेथील सुकलेल्या शेणाचे ढिगारे व इतर सामान हटविण्यात आले. तेथून नंतर बोगदा येथील अंटार्टिका केंद्राजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या तीन झोपड्या पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आल्या.