सी बर्डवर हलविण्याची आमदार आल्मेदांची मागणी
दाबोळी विमानतळ परिसरामध्ये राहणार्या लोकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नौदलाने दाबोळी विमानतळावरील धावपट्टीचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करावा किंवा विमानांची संख्या कमी करून ती कारवार येथील सी बर्ड प्रकल्प असलेल्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा यांनी केली.
नौदलातर्फे मीग-२९ तसेच इतर विमानांचा हवाई सर्वेक्षण, टेहळणी, प्रशिक्षण व कवायतींसाठी वापर होत असून यामुळे होणार्या आवाजाचा त्रास विशेष करून बोगमाळो परिसरातील लोकांना होत असल्याची तक्रार माजी उपसरपंच फिलगेन्सीओ रॉड्रिगीस यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे करून याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. लोकवस्ती असलेल्या ठिकाणी विमान उड्डाण करताना अंतराची मर्यादा ठरवून दिलेली असानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रात्रीच्या वेळी विमानांच्या मोठ्या आवाजामुळे आता झोपणेसुद्धा कठीण झाले आहे. नवीन विमानांमुळे ही परिस्थिती आणखीनच गंभीर झाल्याचे रॉड्रिगीस म्हणाले. यावेळी आमदार आल्मेदा म्हणाले, की विमानांच्या ध्वनी प्रदूषणाचा अनुभव आपण प्रत्यक्षरित्या घेतलेला असून नौदलाने नवीन विमानांना दाबोळीमध्ये दाखल करून न घेता उलट असलेल्या विमानांची संख्या कमी करून ती कारवार सारख्या ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी केली. यासंबंधी आपण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी बोलणी करणार असल्याचे आमदार आल्मेदा यांनी सांगितले.
दरम्यान, एकेकाळी सहलीसाठी प्रसिद्ध असलेल्या भीमवेळ आणि सुरावेल सारख्या ठिकाणी नागरिकांना प्रवेश बंद करून त्या ठिकाणी लष्कर जवानांना ठेवण्यात आल्याने याविषयावर आमदार म्हणाले की, हा प्रश्न विधानसभेमध्ये यापूर्वीच चर्चेला आलेला असून महसूलमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन सभागृहाला दिल्याचे आमदार कार्लुस आल्मेदा म्हणाले.