मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
पूजा नाईक यांना थेट तपासयंत्रणेकडे जाण्याचे आवाहन
नोकऱ्यांसाठी पैसे घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी पूजा नाईक यांना बोलावून परत नव्याने या प्रकरणी चौकशी करून एफआयआर दाखल करण्याचा आदेश आपण पोलिसांना दिला आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी सांगितले. पूजा नाईक यांनी वरील प्रकरणी जाहीरपणे आरोप करण्याऐवजी सर्व काही माहिती पोलिसांना द्यावी तसेच त्यांना जे काही निवेदन करायचे असेल ते पोलीस व न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर करावे. तसेच त्यांना या प्रकरणी ज्या कुणाचे नाव घ्यायचे आहे ते त्यांनी तपास अधिकाऱ्यासमोर घ्यावे. मला वैयक्तिकरित्या येऊन भेटण्याची गरज नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल स्पष्ट केले. तपासासंबंधीची सगळी काही प्रक्रिया ही कायदेशीररित्या केली जाईल, असे मुख्यमंत्री सावंत पुढे म्हणाले.
या घोटाळ्यात ज्या कुणाचा हात आहे त्या व्यक्तीवर कडक कारवाई केली जाईल आणि ती करताना आरोपीचे पद काय आहे याचा विचार केला जाणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. एकदा तपासकाम संपले आणि सत्य काय आहे ते समोर आले की कारवाई केली जाईल. यावेळी आरोपी हा मंत्री आहे की अधिकारी हे पाहिले जाणार नाही. आमचे सरकार हे पारदर्शक आहे असे स्पष्ट करून ते कुणापुढेही झुकणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी वरील घोटाळ्यासंबंधी बोलताना पूजा नाईक यांनी हा घोटाळा तब्बल 16 कोटी रु.चा असल्याचा दावा केला होता व त्यात एक मंत्री, एक आयएएस अधिकारी व एका सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्याचा हात असल्याचा आरोप केला होता.
आरोपींनी आपणाकडून पैसे घेतले होते. मात्र, कुणालाही नोकरी दिली नव्हती असे स्पष्ट करतानाच आपणाकडून घेतलेले पैसे येत्या तीन दिवसांत जर परत केले नाहीत तर आपण मुख्यमंत्र्यांना भेटून आरोपींची नावे उघड करणार असल्याचा इशाराही पूजा नाईक यांनी दिला होता.
पूजा नाईक यांनी तपास यंत्रणेकडे जावे
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे पेडणे येथे सहकार संमेलनाला आले असता, पत्रकारांनी त्यांना नोकरी घोटाळाप्रकरणी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी, सरकारी नोकऱ्यांसाठी पैसे घेतले हा मोठा घोटाळा असून पूजा यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. पूजा नाईक यांनी आपल्याकडे येऊन माहिती देण्याऐवजी किंवा या प्रकरणात असलेल्यांची नावे देण्याऐवजी जे अधिकारी या प्रकरणी तपास करत आहेत त्या अधिकाऱ्यांकडे जाऊन सविस्तर माहिती द्यावी असे सांगितले. पूजा नाईक यांनी केलेल्या आरोपांबाबत पोलिसांना पूर्ण चौकशी करण्याचे आदेशही आपण दिले आहेत. या प्रकरणी पूजा नाईक यांनी, जाहीरपणे जनतेला सांगण्याऐवजी आपण पोलिसांना सांगून तिची चौकशी करायला लावतो. आणि त्यांनी पोलिसांसमोर ती माहिती द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.
गुन्हा अन्वेषण विभागाकडून
पूजा नाईकची कसून चौकशी
सरकारी नोकरी घोटाळ्यातील एक संशयित आरोपी पूजा नाईक हिने राज्यातील एका आयएएस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्यातील अभियंता आणि एका कॅबिनेट मंत्र्याला 17 कोटी रूपये दिल्याचा सनसनाटी आरोप केल्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने पूजा नाईक हिची काल सुमारे 4 ते 5 तास चौकशी केली.
सरकारी नोकरी देण्यासाठी घेतलेले 17 कोटी रुपये चोवीस तासांत परत न केल्यास त्यांची नावे जाहीर करण्याची धमकी पूजा नाईक हिने दिली होती. पूजा नाईक हिने केलेल्या आरोपांनंतर सरकारी नोकर भरती घोटाळ्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निर्देशानुसार गुन्हा अन्वेषण विभागाने संशयित आरोपी पूजा नाईक हिला या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावून घेतले. पोलीस अधिकाऱ्यांनी पूजा हिच्यावर प्रश्नाचा भडिमार करून चौकशी केली.

