नेमळे अपघातात तिघा जणांचा मृत्यू

0
14

मृत व्यक्तींमध्ये गोव्यातील दोघा जणांचा समावेश

चालकाचे नियंत्रण सुटल्याने थारचा झाला चक्काचूर

दोघा सख्ख्या बहिणींचे सावंतवाडी रुग्णालयात निधन

एकाचा गोमेकॉत मृत्यू; दोघा जखमींवर उपचार सुरू

मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात काल दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने एक भरधाव थार कार रस्त्याबाहेर जाऊन खोल भागात कोसळली. त्यात थारचा चक्काचूर झाला. या अपघातात गोव्यातील दोघांचा, तर कणकवलीतील एका महिलेचा मृत्यू झाला. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. या अपघातात गंभीर जखमी झालेला थारचालक सनी नानोडकर याचे आई-वडील आणि मावशी अशा तिघा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पांडुरंग नानोडकर (65, रा. गिरी) आणि त्यांच्या पत्नी तथा गिरीच्या पंच सदस्य श्रीमती नानोडकर (58, रा. गिरी) या गोव्यातील दोघांचा समावेश आहे. तसेच या अपघातात श्रीमती नानोडकर यांची सख्खी बहीण विलासिनी सातार्डेकर (54, रा. भिरवंडे-कणकवली) यांना देखील जीव गमवावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, नानोडकर कुटुंबीय आणि आणखी काही जण हे जीए-03-एएम-8478 क्रमांकाच्या थार वाहनातून गिरी येथून कणकवलीतील भिरवंडे येथे जात होते. काल दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास त्यांचे वाहन मुंबई-गोवा महामार्गावर नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात पोहोचले असता चालक सनी नानोडकर याचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनाचा वेग जास्त असल्याने थार रस्त्याबाहेर जाऊन धडकत खाली दरीत कोसळली.

ग्रामस्थांची घटनास्थळी धाव
अपघातानंतर मोठा आवाज आल्याने येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मतदतकार्य सुरू केले. स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने जखमींना वाहनातून बाहेर काढण्यात आले. यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले.

सामाजिक संस्था धावल्या मदतीला!
अपघात घडताच नेमळे येथील स्थानिक ग्रामस्थ आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीबाहेर काढले. ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ आणि ‘108′ च्या रुग्णवाहिकेतून जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात तातडीने उपचार
उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत, डॉ. गिरीश चौगुले, डॉ. निखिल अवधूत, परिचारिका श्रीम. गोसावी आणि श्रीम. नाईक यांनी जखमींवर प्राथमिक उपचार केले. रुग्णालयात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, शैलेश नाईक, रवी जाधव, लक्ष्मण कदम, रूपा मुद्राळे आणि रुग्ण कल्याण समितीचे सदस्य देव्या सूर्याजी यांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील काही व्यवस्थांबाबत देव्या सूर्याजी व रवी जाधव यांनी नाराजीही व्यक्त केली.

पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल हनुमंत धोत्रे, मनोज राऊत, प्रिया नाईक, निलेश नाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी रुग्णालयात भेट देऊन पुढील कार्यवाहीचे आदेश दिले. सावंतवाडी पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

वेगाच्या मोहाने हिरावले तिघांना
आनंदी प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबाला नियतीने दुःखाचा चटका दिला. काही क्षणांपूर्वी हसत-खेळत सुरू झालेला प्रवास मृत्यूच्या सावटाखाली संपला. नेमळेतील या हृदयद्रावक दुर्घटनेने पुन्हा एकदा वेगाच्या बेफिकीरीची किंमत किती मोठी असू शकते, याची जाणीव करून दिली.