शेकडो नागरिक पाण्याच्या लोंढ्याबरोबर गेले वाहून; 500 हून अधिक बेपत्ता; पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली घरे
नेपाळमध्ये आलेल्या महापूराने रेसुवा जिल्ह्यात मोठा विध्वंस केला. अचानक आलेल्या महापुरामुळे नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात प्रचंड विध्वंस झाला. बुधवारी सकाळी 9 वाजता तिबेटमधील भोटेकोशी नदीच्या पात्रात अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने या प्रदेशात धुमाकूळ घातला आणि अनेक भाग पाण्याखाली गेले. या महापुरात हजारो नागरिक वाहून गेले, नदीकाठची अनेक घरे पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली. या महाप्रलयात आतापर्यंत 100 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, 500 हून अधिक जण बेपत्ता आहेत. नेपाळ पर्यटन मंडळाच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत एकूण 291 परदेशी नागरिकांसह किमान 384 पर्यटक बेपत्ता असून, त्यात सुमारे 133 भारतीय पर्यटकांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळी लष्कराकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारताने नेपाळच्या मदतीसाठी तातडीने हात पुढे केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा महापूर स्थानिक मुसळधार पावसामुळे आलेला नसून, तिबेटमध्ये हिमशिखर सरोवर फुटल्याने आला आहे. त्यामुळे भोटेकोशी आणि त्रिशुली नदीच्या पाण्याचा स्तर अचानक काही मिनिटांत प्रचंड वाढला. या महाप्रलयात 1000 हून अधिक नागरिक वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तरगया ग्रामीण नगरपालिकेच्या उपाध्यक्षा चमेली गुरुंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्याफ्रुबेसी, बेत्रावती, मैलुंग, सालेतार, शांती बाजार, परेबेसी, खाल्टी बस्ती, सोले, त्रिशुली आणि बत्तर या नदीकाठच्या वस्त्यांना पुराचा सर्वांत मोठा फटका बसला असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नेपाळ लष्कर आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून बाधित भागात युद्धपातळीवर बचावमोहीम राबवली जात आहे. पुराचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
लष्कराचे प्रवक्ते राजाराम बस्नेत यांनी दिलेल्या माहितीनुसर, पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी लष्कराची हेलिकॉप्टर पाठवण्यात आली. मात्र, संपूर्ण परिसरात प्रचंड प्रमाणात पाणी साचल्यामुळे हेलिकॉप्टर खाली उतरू शकली नाहीत.
भारताला अलर्ट राहण्याचा इशारा
नेपाळमधील या महापुराचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता आहे. नेपाळमधील त्रिशुली नदीच्या पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली आहे. हीच नदी पुढे नेपाळमध्ये नारायणी नदीला जाऊन मिळते आणि भारतात प्रवेश केल्यानंतर तिला ‘गंडक नदी’ म्हणून ओळखले जाते. गंडक नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता असून, भारतातील विशेषतः बिहार राज्याच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील प्रशासनाला आणि नागरिकांना सतर्कतेचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
नेपाळच्या पंतप्रधानांशी चर्चा
नेपाळमधील या हृदयद्रावक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधून दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण प्रसंगात संपूर्ण भारत देश आपल्या नेपाळी बंधू-भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नेपाळला सर्व प्रकारची मानवी मदत पुरवण्यासाठी भारत पूर्णपणे तयार आहे. मदतकार्यात भारत सहाय्य करेल, असे आश्वासनही मोदींनी दिले.

