नेपाळचा धडा

0
18

‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा । पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा..’ अशी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची प्रसिद्ध कविता आहे. नेपाळमधील पूरग्रस्त आज ह्याच निर्धाराने आपले महाप्रलयात वाहून गेलेले संसार पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी उभे राहत आहेत. अनेकांनी आपल्या कुटुंबातील सदस्य गमावले, अनेकांचे घरदार नष्ट झाले, वर्षानुवर्षांच्या परिश्रमांतून जमवलेल्या सगळ्या चीजवस्तू वाहून गेल्या. अशा स्थितीत जे काही हाती उरले आहे, त्याच्या आधारावर पुन्हा एकदा जीवनाला सामोरे जाण्याची ही धडपड आहे. नेपाळमधील महापुराने उडवलेल्या हाहाकाराच्या दर्दभऱ्या कहाण्या दिवसागणिक समोर येत आहेत. मृतांची आणि बेपत्ता असलेल्यांची संख्याही वाढत चालली आहे. आजवर किमान नऊशे मृतदेह सापडले आहेत, तर तीन हजारांवर लोक बेपत्ता आहेत. मलब्याखाली, ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्यांचा जीव वाचवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. विशेषतः नेपाळमधील जवळजवळ अकरा जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अडकून पडलेल्या नऊशेहून अधिक कामगारांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त नेपाळमध्ये लष्कराचे जवळजवळ वीस हजार जवान आणि पोलीस दल मदतकार्यात अहोरात्र जुंपले आहे. बाहेरच्या मदत पथकांची मदत नेपाळने आधी नाकारली, कारण ह्यापूर्वीच्या मदतकार्यांवेळी बाहेरून आलेल्या मदतपथकांच्या समन्वयाचा प्रश्न उभा राहिला होता असे कारण त्यांनी पुढे केले. परंतु नंतर काही देशांच्या वैद्यकीय मदतपथकांना नेपाळने येऊ दिले आहे. सध्या नेपाळ सरकारने चालवलेल्या मदतकार्याच्या संथगतीबाबत पूरग्रस्तांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत. जसजसे दुर्घटनेला तास उलटत चालले आहेत, तसतशी ही नाराजी वाढते आहे. मलब्याखाली अडकलेल्या दुर्दैवी नागरिकांना बाहेर काढण्यात जेवढा उशीर होईल, तेवढी त्यांचा जीव वाचण्याची शक्यता कमी होत चालली आहे. आजवरच्या मदतकार्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृतदेह सापडले आहेत की नेपाळमधील शवागारे कमी पडली आहेत. शेवटी मृतदेहांचे डीएनए नमुने गोळा करून मातीमध्ये तात्पुरते दफन करण्यात आले आहे. शेकडो मृतदेहांची, विशेषतः पर्यटकांची ओळख पटू शकलेली नाही. तेवीस देशांतील पर्यटकांचा ह्या पुरामध्ये बळी गेला आहे किंवा बेपत्ता आहेत. जलविद्युत प्रकल्पांमध्ये अडकलेल्या कामगारांमध्येही नेपाळी कामगारांबरोबरच भारत, चीन आणि दक्षिण कोरियाच्या कामगारांचा समावेश आहे. त्यांचा शोध घेण्यास नेपाळ सरकारने प्राधान्य दिले आहे. रात्रंदिवस ते शोधकार्य सुरू आहे. भारत सरकारनेही त्यासाठी अशा बोगद्यांच्या दुर्घटनांवेळी शोधकार्यात भाग घेण्याचा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांना व वैद्यकीय पथकास नेपाळला रवाना केलेले आहे. मदतकार्यामध्ये खराब हवामान, सतत पडणारा पाऊस आणि तिबेटमध्ये पुरावेळी निर्माण झालेला तलाव फुटण्याची असलेली भीती यांचा अडथळा येत आहे. ह्या महाप्रलयामध्ये त्रिशुली आणि भोटेकोशी नद्यांच्या काठच्या गावांना सर्वाधिक फटका बसलेला पाहायला मिळतो. विशेषतः नेपाळमधील रसुवा आणि नुवाकोट ह्या जिल्ह्यांमध्ये हानी अधिक आहे. ह्या महाप्रलयामुळे केवळ नेपाळच नव्हे, तर अशा प्रकारच्या पर्वतीय राज्यांमधील बेबंद विकासकामांचे निसर्ग आणि पर्यावरणावर होणारे परिणाम आणि अशा दुर्घटनांवेळी त्याचे भोगावे लागणारे परिणाम ठळकपणे समोर आले आहेत. भारतातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर आदी राज्यांमध्ये आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना सातत्याने घडत असतात. नेपाळमध्ये ज्या प्रकारची भयावह दृश्ये ह्या महापुरावेळी दिसली, तशीच भयावह दृश्ये आपल्या उत्तराखंडमध्ये ह्यापूर्वी दिसली होती. धराली गाव कशा प्रकारे क्षणार्धात पुराने आणलेल्या ढिगाऱ्यांखाली गेले, त्याच प्रकारे नेपाळमध्ये अनेक गावे बघता बघता क्षणार्धात नष्ट झाली. प्रश्न त्यापासून काही धडा घेतला जाणार आहे की नाही हा आहे. अशा प्रकारची एखादी थरकाप उडवणारी दुर्घटना घडली की ह्या विषयावर प्रत्येक वेळी चर्चा होते. तीव्र चिंता व्यक्त केली जाते, परंतु उपाययोजना मात्र केल्या जात नाहीत. भूतानसारखा पर्वतीय देश आज सत्तर टक्के वनाच्छादित स्वरूप राखण्यात यशस्वी ठरला आहे. तरीही जगातील सर्वांत समाधानी देश आहे. आपण किमान अतिक्रमणे तरी रोखायला नको का? नदीच्या प्रवाहाला बाधा आणणारी बांधकामे आणि अतिक्रमणे ह्या महाप्रलयामुळे स्पष्टपणे नजरेसमोर आली. हेच दृश्य भारतातील पर्वतीय राज्यांतही दिसते. निसर्गाला आडकाठी आणणाऱ्यांना मग एखाद दिवस त्याने तडाखा दिला की मग होत्याचे नव्हते होण्यास एक क्षणही पुरेसा ठरतो.