Home बातम्या नेत्रहीनांसाठी अनाम प्रेमची दृष्टी सृष्टी

नेत्रहीनांसाठी अनाम प्रेमची दृष्टी सृष्टी

0

१०० अंध विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम

अनाम प्रेम या संस्थेने २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुणे, अमरावती, मंदनगड व कोल्हापूर येथील नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या गोवा सहलीच्या निमित्ताने १०० अंध विद्यार्थी व अंधांना मदत करणारे राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते गोव्यात येणार आहेत. हा अनोखा उपक्रम गोव्यात पहिल्यांदाच होत आहे. हा आनंदोत्सव अंधांच्या सृष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्यासाठी आहे अशी माहिती आयोजकांच्यावतीने सतीश सोनक व चिंतामणी सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. नेत्रहीन मुलांच्या पालकांनी सहभागी होवून आपल्या मुलांचे भवितव्य घडवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

२६ ऑक्टोबर रोजी शनिवारी, नेत्रहीन पाहुणे दुपारी ३.३० वा. मिरामार येथील विज्ञान केंद्राला भेट देतील. २७ ऑक्टोबरला रविवारी सकाळी ९ ते १० दरम्यान होणार्‍या जलसफरीत अंधांना मदत करणारा कु. ऋग्वेद जावडेकर हा शालेय विद्यार्थी सन्माननीय पाहुणा असेल. ११ ते १ वाजेपर्यंत कांपालमधील महावीर बालोद्यानात खेळ व विविध स्पर्धात्मक कार्यक्रम होणार आहेत. व त्यात संजय स्कुलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर हे प्रमुख पाहुणे असतील. त्याचवेळी कला संस्कृती भवन पाटो मधील सेंट्रल लायब्ररीच्या सभागृहात ‘स्पेशल चिल्ड्रन प्लेइंग टु लर्न’ या सौ. पाम गांडेकर लिखित खास पुस्तकाचे प्रकाशन अंध प्राध्यापक, कवी पी. ए. महाजन यांच्या हस्ते होईल. श्री. महाजन हे अंधांसाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय संस्थेचे सह-संस्थापक आहेत. याप्रसंगी विजया मेमोरियल ट्रस्टचे विश्‍वस्त आणि उद्योजक डॉ. रमेश साठे मंद दृष्टीवर मात करणार्‍या उपकरणांची सेंट्रल लायब्ररीला भेट देवून त्याविषयी सादरीकरण करतील. या कार्यक्रमाची सांगता मुक्त चर्चेने होईल. या चर्चेच्या अध्यक्षपदी हेलन केलर संस्थेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी योगेश देसाई असतील. त्यांनी गुरुग्रंथसाहेबचे १८ ब्रेल खंड निर्माण केले असून सध्या अंधांसाठी ब्रेल लिपीतील शब्दकोष साकारत आहेत. २७ ऑक्टोबरला ३.३० ते ६.३०च्या दरम्यान इन्स्टीट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात अंध विद्यार्थी ‘दृष्टी सृष्टी’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. इन्स्टिट्युटचे अध्यक्ष संजय हरमलकर पारितोषिक वितरण करतील. या कार्यक्रमात संवेनशील मराठी कवयित्री प्रभा गणोरकर या अंतरवेध अंधविषयक मासिकाचे प्रकाशन करतील व त्यावेळी कवीवर्य वसंत आबाजी डहाके हे आपल्या कविता सादर करतील. २८ ऑक्टोबर रोजी खास बसेसमधुन गोवा दर्शन सहल व २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता युथ हॉस्टेल येथे निरोप समारंभ होईल. सर्व कार्यक्रम विनाशुल्क असून सर्वांना खुले आहेत.